नमस्कार ! आमच्या औंध.इन्फो या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत ! आम्ही या संकेतस्थळामार्फत तुम्हाला घेऊन जाणार आहोत, औंधच्या राजाच्या राज्यात, त्याच्या राजधानीत आणि राजवाड्यात...
काळाच्या ओघात आज जुनी डोलार, दुमजली घरं, नवी रुपडं धारण करत असली तरी अजुनही जुने रस्ते, अंगणातील रांगोळी, तुळशीचे कट्टे, नक्षीदार दरवाजे आणि अंबारखाने साद घालतात, ऐतिहासिक शोध घेणाऱ्या शोधकाला...
औंधची चित्र तशी काही शतकापूर्वीची तर काही सत्तरीच्या वयाच्या बुजुर्गपणात एकमेकांची चढाओढ करणारी ! पण चित्रातील रंगांचा तजेलपणा आजूनसुद्धा तरुणाईला लाजवणारा, डोळ्यातील चमक मनाला भुरळ पडणारी !... चित्रातील पाणी पाहुन स्पर्शाने हात ओला करून घ्यावा, असे वाटले नाहीतर नवलच !...
जसी चित्रांची अदाकारी मन भुलवणारी तशी वास्तुशिल्पांची कारागिरी मेंदूला झिणझिण्या आणणारी. पुतळ्यात सुद्धा सजीवपणा असतो, मान्य करायला भाग पडणारी...
औंधची नगरी श्रद्धेने भरलेली, देवीच्या कृपेने तरलेली आणि भाविकांच्या भक्तीने उधान आलेली आहे. आजसुद्धा २१ व्या शतकात काही लोक औंधच्या यमाईच्या मंदिरासामोरचे दोन फिरते खांब आवर्जून फिरवून पाहतात, श्रद्धा अशी आहे कि, जो हे खांब फिरवतो तो त्याच्या आयुष्यातील कोडी सोडवितो. हि श्रद्धा काही जणांनी अंधश्रद्धा मानली तरी खांबांची रचना, फिरण्याची कल्पना वाखाणल्याशिवाय राहत नाही.
जोतिबाचा डोंगर, यमाईची टेकडी, गावातील भवानी मातेचं मंदिर यांना धार्मिक साज चढवा किंवा सांस्कृतिक दोन्ही ठिकाणी न्याय देणारे !
असा अनमोल ठेवा शोधत फिरणारा प्रवासी असो किंवा कवी, कलाकार, शोधक, चित्रकार, सौंदर्याची जाण असणारा सुज्ञ यांना भौगोलिक सीमेचं बंधन नसतं म्हणून आम्हीं अशी अंतर तोडून धावणाऱ्या मनांना साद घालत आहोत, औंधकडे येण्याची...