लाभला एक उद्योगी राजा औंधच्या प्रजेसाठी...
ज्याने घेतला वसा सूर्यनमस्कार प्रचारासाठी...
खुल्या तुरुंगाचा प्रयोग घडविला मानवतेसाठी...
लोकशाहीची संकल्पना राबवली जनतेसाठी...
त्यांनाच लाभले होते सुंदर मन कीर्तने रंगण्यासाठी...
उचलला होता कुंचला चित्रांना जिवंत करण्यासाठी.....
बाळासाहेब पंतप्रतिनिधी : औंध... एक ऐतिहसिक संस्थान !

  • माजी औंध संस्थानाधिपती श्रीमंत भगवानराव पंडित पंतप्रतिनिधी यांचा धावता जीवन वृत्तांत. :-
  •  
  • संस्थांचे अधिपती श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव उर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधी बी. ए. हे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण होते. ते मंबई विश्व विध्यालायाचे पदवीधर ( बॅचलर ऑफ आर्ट्स ) असून उत्तम चित्रकार व कीर्तनकार होते.
  • १८६८ : शनिवार दि. २४ ऑक्टो. १८६८ रोजी महाराष्ट्रातील अत्यंत तेजस्वी, पराक्रमी व कीर्तिमान म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रतिनिधि घराण्यात जन्म.
  • १८७१ : जिवावरच्या दुखण्यातून पुनर्जन्म !
  • १८७३ : प्राथमिक शिक्षणास प्रारंभ - औंध.
  • १८७६ : व्रतबंध.
  • १८७८ : काशीयात्रा मातेसमवेत.
  • १८८१ : माध्यमिक शिक्षणास प्रारंभ - सातारा.
  • १८८५ : ओईल पेंटींगच्या छंदास प्रारंभ.
  • १८८६ : पहिला विवाह.
  • १८८८ : मेट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
  • १८८९ : महाविद्यालयीन शिक्षणास प्रारंभ - पुणें डेक्कन कॉलेज.
  • १८९१ : वडिलांच्या प्रोत्साहनाने कीर्तनास प्रारंभ.
  • १८९३ : बी. ए. परीक्षा उत्तीर्ण संस्थानिक घराण्यात पदवीधर होण्याचा मान.
  • १८९४ - ९५ : एल. एल. बी. चा आभ्यास चित्रकला व फोटोग्राफी कलांचा अभ्यासास रविवर्मा व श्रीरामपंत जोशी यांच्या सानीध्यात.
  • १८९७ - १९०१ : सप्टेंबर १८९७ मध्ये औंध दरबारात सरचिटणीस म्हणून नेमणूक व या कारकिर्दीत सर्व कर्जाची परतफेड हे वैशिष्टपूर्ण कार्य.
  • १९०१- १९०८ : औंध संस्थानाबाहेर वास्तव्य.
  • १९०९ : ४ नोव्हेंबर रोजी राज्यारोहन.
  • १९१६ : संस्थानात ग्रामपंचायतीची स्थापना.
  • १९१७ : ३१ ऑक्टो. रोजी पहिली रयत सभा.
  • १९१९ : १ एप्रिल रोजी डॉ. भांडारकर यांच्या प्राच्य संशोधन मंदिरास, महाभारत संशोधन प्रकाशनास १ लाख रुपयांचे अनुदान.
  • १९२१ : ड्युक ऑफ कॅनॉटशी मुलाखत.
  • १९२४ : बारामती येथे डिव्हिजनल को - ओपरेटिव कोन्फरन्सचे अध्यक्ष.
  • १९२५ : मुंबई येथे व्यापारी परिषदेचे अध्यक्ष.
  • १९२६ : अजिंठा, वेरूळ येथील चित्रांच्या नकला करवल्या.
  • १९२८ : व्यायाम, नमस्कार, आरोग्य व आहार या विषयावर २५ व्याख्याने दिली.
  • १९३० : कुंडल येथे सूर्योपासना मंदिराचे उदघाटन.
  • १९३४ : १३ ते १६ नोव्हेंबर राज्यसुत्रे धारण केल्यास २५ वर्षे झाली म्हणून महोत्सव गौरव ग्रंथ समर्पण.
  • १९३५ : इंदुरच्या साहित्यासामेल्नाच्या अध्यक्षपदावर निवडणूक.
  • १९३६ : युरोप व आफ्रिका या देशांचा दौरा.
  • १९३७ : प्रजेस जबाबदार स्वराज्य देण्याची व पंचवार्षिक योजनेची घोषणा. 'राजा' हा किताब ब्रिटिश सरकारने दिला.
  • १९३९ : संस्थांच्या कारभारात लोकनियुक्त मंत्री नेमण्यास प्रारंभ केला.
  • १९५१ : १३ एप्रिल रोजी मृत्यू .
स्त्रोत : औंध संस्थानाधिपती श्रीमंत भवानराव पंडित पंत प्रतिनिधी जन्मशताब्दी स्मरणिका | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
श्रीमंत भगवानराव पंडित पंतप्रतिनिधी
बाळासाहेब - वय वर्षे ६ असताना
ग्लायडर उड्डाण

श्रीमंतांचे विचारदर्शन :

 

व्यायाम : सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार घाला म्हणजे त्यांच्या योगाने तुमच्या अंगी तडफ, धडाडी, साहस इ. क्षत्रागून उत्पन्न होऊन तुम्ही आरोग्यवान व्हाल.
- बोध वचने भवानराव गौरव ग्रंथ पृ . १५७

समर्थ प्राप्त करा ! :

'सा विद्या मुक्तये' असे शिक्षणाचे ध्येय आहे. सर्वाच्या आधी आपले शरीर सामर्थवान झाले पाहिजे.
- बोध वचने भवानराव गौरव ग्रंथ पृ. ५७५

ग्रामोध्दार :

सुधारणा करावयाची ती अनेक बाजूंनी केली पाहिजे. त्यातील एकच गोष्ट घेऊन ती आधी सुधारून मग बाकीच्या गोष्टीस हात घालू असे म्हणून भागणार नाही : कारण ज्याची सुधारणा केली पाहिजे त्या गोष्टी परस्परावलंबी आहेत. सर्व विषयांची सर्व बाजूंनी हळू हळू कां होईना पण सर्व बाबींची सुधारणा केली पाहिजे. नाहीतर प्रगतीचे पाऊल पुढे पडणे अशक्य होते.
- बोध वचने भवानराव गौरव ग्रंथ पृ. ५६६
"नागरिकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे कि कर्तव्यपालन झाले कि त्यामागे हक्क चालत येतात : मागावे लागताच नाही."
- श्रीमंतांचे बोधवचने भवानराव गौरव ग्रंथ पृ . ५५३

व्यापारांत स्वावलंबन :

" परदेशाहून येनाऱ्या नाना प्रकारच्या वस्तूप्रमाणे आपण यांत्रिक सहाय्याने तशा प्रमाणात तशा वस्तू आपल्या देशात निर्माण केल्यावाचून आपला देश भरभराटीस येणार नाही.
- श्रीमंताचे भाषण गौरव ग्रंथ भाग २ रा पृ. १९
कच्चा माल देऊ नये
पक्का माल घेवू नये
पक्का द्यावा
कच्चा घ्यावा

प्रतिज्ञा करा !

"सर्व ठिकाणी ईश्वरभाव धरून माझ्या अंगाच्या सामर्थ्याने मी ऐहिक व पारमार्थिक उन्नती करीन असे म्हंटले पाहिजे."
- बोध वचने भवानराव गौरव ग्रंथ पृ . ५७४

स्त्रियांची उन्नति :

"आपली सर्वांगीण उन्नती व्हावयास स्त्रिवर्गाचीही आरोग्य, सुप्रजनन, गृह्व्यवस्था, शिक्षण, उद्योग आणि स्वसंरक्षणाची जाणीव व त्याची तयारी याबाबतीत उन्नती व्हवयास पाहिजे."
- बोध वचने भवानराव गौरव ग्रंथ पृ . ५५१
"कोणत्याही विध्यांचा अथवा कलाकौशल्याचा उपयोग एकंदर समाज उधोगी, निरोगी उत्साही, पराक्रमी, प्रामाणिक, सदाचारी आणि धर्मनिष्ट करणे हाच असला पाहिजे."
- श्रीमंताचे भाषण भवानराव गौरव ग्रंथ भाग २ रा पृ. २६

शिक्षणाचा उद्देश :

शिक्षणाचा उद्देश शरीर, मन, बुद्धि यांचा विकास करून माणसाच्या अंगच्या गुणसामर्थ्याचा परिपोष करणे व त्याला आपल्या समाजाच्या सर्व बाजूच्या उन्नतीस कारणीभूत करणे होय."

चित्रकला :

"पहाणाऱ्याच्या अंतःकरणात मनोविकार उत्पन्न व्हावेत हा चित्राचा अगर पुतळ्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे."
- श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बी. ए. चीफ ऑफ औंध.

समाधान पाहिजे :

समाधानाशिवाय कार्य कार्याकरतां येत नाही. - ( ता. २० जून १९३२ )
- श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बी. ए. चीफ ऑफ औंध.

खुली चर्चा करा ! :

लोकांच्या भाषणावर किंवा खुल्या चर्चेवर नियंत्रण घालणारे आम्ही नाही. तोंडाला एक पट्टा आणि कमरेला एक पट्टा घालून मागे ओढणारा मी नव्हे.- ( ता. २० जून १९३२ )
- श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बी. ए. चीफ ऑफ औंध.

अस्पृश्यतानिवारण :

आपलीं शरीरें व आपले कपडे नेहमी ते निर्मळ ठेवतील तर सरकारी कचेरींत, सार्वजनिक सभेंत व देवालयांत बसण्याला व इतर समाजांत वावरण्याला त्यांस कोणीहि मज्जाव करणार नाही. ( ता. २३ डिसेंबर १९३२ )
- श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बी. ए. चीफ ऑफ औंध.

जोडधंदा :

कृषीकर्माला उधोगाची जोड दिली पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांचा तरणोपाय नाही. ( २६ जून १९३३ )
- श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बी. ए. चीफ ऑफ औंध.

 

स्त्रोत : भवानराव गौरव ग्रंथ | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
' नमस्कारासन '
वक्ता
चित्रकार
यंत्र प्रेमी राजा किर्लोस्कारांसोबत
चित्रकार पुराम क्लासला भेट - १९३४
'अर्थमूलौ धर्मकामौ' हें बाळासाहेबांचे सूत्र होते. धर्म आणि काम हे अर्थावर अवलंबून असते. म्हणूनच आपल्या प्रजेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे बाळासाहेबांचे विशेष लक्ष होते. सूतसारापद्धति हि शेतकऱ्यांसाठी त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सहाय्य होणारी होती. न्याय व्यवस्थेमध्ये सल्लागार पंचाची जोड हि फक्त औंध संस्थानातच होती.

राज्यकारभारविषयक प्रगति आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याविषयींचे प्रयत्न ह्यांच्याबरोबर ललित कलांचा झालेला परिपोष म्हणजेच औंध संस्थान.

बाळासाहेब हे पहिल्या पंक्तीचे कीर्तनकार होते. त्यांच्या अंगी विविध कला अधिष्ठित झाल्या होत्या - नावाजलेले चित्रकार, शिल्पकलेचे ज्ञानहि संपादन केले होते, नाटकाची हौस होती, फोटोग्राफी उत्तम होती, कीर्तनाकरितां काव्यरचना, अश्या अनेक कला चे अधिष्ठान म्हणजे बाळासाहेब अश्या राजामुळे औंध संस्थान कला-मंदिर बनले होते.

नदीचा उगम स्वच्छ असला म्हणजे नादिंतील जलप्रवाहहि आगंतुक व्यत्यय न आल्यास निर्मळ व ओजस्वी असणें स्वाभाविक आहे.

गुणा गुणज्ञेषु गुणीभवन्ति |
ते निर्गुणं प्राप्य भवन्ति दोषा: |
सुस्वादुतोया: प्रवहन्ति नध्यः |
समुद्रमासाध्य भावन्त्यपेया: ||

श्रीमंतांच्या अंगी असणाऱ्या गुण वैशिष्टयांचा आढावा पुढील मुद्यांच्या मार्फत घेता येईल. -
स्त्रोत : संदर्भ सूची | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
श्रीमंत भगवानराव पंडित पंतप्रतिनिधी
बाळासाहेबांनी काळावर नजर ठेवून लौकिक वाढवला कारण ते दिवस तलवार गाजवून लौकिक मिळवण्याचे नव्हते हे त्यांनी जाणले होते. विद्यावृद्धी करून ज्ञान संपादन करणे हीच त्या काळात तलवार होती त्या करिता संस्थानात शाळा स्थापन करून प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. महाराज स्वत: उच्च शिक्षित होते. त्यांनी संथानिकांमध्ये पहिला बी. ए. होण्याचा सन्मान मिळवला होता. पुढे यल.यल.बी. चा अभ्यास, फोटोग्राफीचा अभ्यास, चित्रकलेचा अभ्यास अश्या विविध विद्या त्यांनी प्ररंगत केल्या होत्या म्हणूनच आपल्या संथानात त्यांनी या सर्व गोष्टींना वाव दिला.
स्काउटिंग, पोहणे, प्रौढ शिक्षण, मुलींची शाळा, स्कॉलरशिप्स, शेतकी शिक्षण, वेदपाठक शाळा, कीर्तन संस्था, सुत व विणकाम, रात्रीच्या शाळा, मॉडेल क्लास, मिडल स्कूल, हायस्कूल, हस्तकौशल्य, टेक्निकल स्कूल, धार्मिक व नैतिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, वर्ल्ड फेडरेशन या सर्व शिक्षणाच्या सोई संस्थानात होत्या.

१.) शाळा (श्री यमाई श्री निवास हायस्कूल ) :

सन १८९७ - १९०१ साली बाळासाहेब हे औंध संस्थांचे चीफ सेक्रेटरी म्हणून काम पाहत होते या काळात त्यांनी संस्थानवर असणारे सर्व कर्जाची फेड केली हे उल्लेखनीय आहे. त्यामुळे शिल्ल्ख पैश्यांचा योग्य विनियोग केला जावा यासाठी श्री यमाई श्री निवास हायस्कूलची कल्पना करून या हायस्कूलमध्यें मुलांना फी तर नाहीच पण कांही गरीब विध्यार्थांस भरपूर माधुकरी ध्यावी, या प्रमाणे सन १८९८ सालीं हायस्कूल सुरु केलें.
ड्रॉईंग : औंध हायस्कुलात १९१० साला पासून ड्रॉईंग ( चित्रकला ) हा विषय आवश्यक विषय करून ड्रॉईंग मास्तर म्हणून स्वतंत्र शिक्षक नेमण्यांत आले.
लोकशिक्षण विविध तर्हेचें व झपाट्याने झाल्याचे दिसून येते. संस्थानात ७२ खेड्यांत ८५ शाळा होत्या.

२.) मुला, मुलींना मोफत, सक्तीचे शिक्षण :

आपल्या गरीब रयतेच्या मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते पण त्यामुळे गरीब शेतकरी लोकांचा खाण्याचा प्रश्न होतातच म्हणूनच हे शिक्षण मोफत होते.
आम्ही इकडे शेतकऱ्यांच्या पोटापाण्याची तजवीज न करतां सुधारणेचे उपाय योजतों. हें जोंपर्यंत चालेल, तोंपर्यंत आमच्या प्रयत्नांना यत्किंचितहि यश येणार नाही. असे बाळासाहेब म्हणत असत.

३.) मोफत वसतिगृहे :

श्रीमंत बाळासाहेबांनी औंध हयस्कुलांत बाहेर गावांहून येणारे विध्यार्थांची राहण्याची सोय करणेकरता श्रीराम पंचवटी देवस्थान व श्रीकेदारेश्वर देवस्थान या दोन देवस्थानचे खर्चातून दोन निरनिराळीं वसतिगृहें बांधण्यात आलीं होती. श्रीकेदारेश्वर व पंचवटी अशी दोन मोफत विध्यार्थी वस्तीग्रहे निर्माण केली होती. गरजू व गरीब विध्यार्थांना हि वस्तीग्रहे खूप उपयुक्त ठरली म्हणूनच औंध येथे पूर्ण महाराष्ट्रातून विध्यार्थी येत असत.

४.) व्यावसायिक आणि कलेचे शिक्षण ( त्रिंबक-कला-भुवन ) :

हल्ली आपण आय. टी. आय. च्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण घेत असतो पण त्याकाळी बाळासाहेब महाराजांनी त्रंबक कलाभवन या नावाने एक स्वतंत्र वस्तू बांधून त्यामध्ये सुतारकाम, शिवणकाम, शिल्पकला, चित्रकला, विणकाम, भरतकाम अश्या असंख्य प्रकारचे व्यावसायिक शिक्षण दिले जात होते. औंधास सुत काढण्याचे व विणकाम शिवण्याचे सोयीसाठी त्रिंबक-कला-भुवन स्थापन केले.

५.) प्रयोगशाळा :

उद्योगवृद्धीसाठी लॅबोरेटरी सुरु केली होती. या लॅबोरेटरींतून तयार झालेलें हिपुरिक अॅसीड हें जर्मन मालापेक्षाही अधिक शुध्द होते. असें अमेरिकन मार्केटमध्ये ठरलें व युरोपच्या महायुद्धाच्या वेळीं अमेरीकेंतून हजारो रुपये औंध संस्थानांत यामुळे आले, हें एकपरी संस्थानास भूषणच होते. याशिवाय अत्तरे, सोडा, ब्लिचिंग पॉडर, बेंझाइक अॅसिड वगैरे संबधी अनेक प्रयोग या प्रयोगशाळेत झाले. मंजीष्टापासून रंग तयार करून पक्के रंग तयार करत.

६.) औंध मुद्रणालय :

औंधला १९२० साली विजयादशमीचे सुमहुर्तावर बाळासाहेब महाराजांनी "औंध स्टेट प्रेस" सुरु केली तसेच औंध स्टेट गॅझेटहि सुरु करण्याची परवानगी याच वेळी दिली.
या प्रेस मध्ये चीत्ररामायण, अजिंठा, वेरूळ, प्रतिनिधी घराण्याचा इतिहास, आदित्य ह्र्दय हि सचित्र पुस्तके छापली गेली. त्यासाठी बाळासाहेब महराजांनी दत्तत्रय सीताराम इंगळे, रामचंद्र दत्तात्रय दाभाडे यांना पुणे येथे खास प्रशिक्षणास पाठवून हि कला अवघत करून घेतली होती.
पं. श्री. दा. सातवळेकर यांनी "भारत मुद्रणालय" औंध येथे १९२३ साली स्थापन केले. या मुद्रणालयात स्वाध्याय मंडळाची पुस्तके व मासिके छापली जात होती.

७.) वाचनालय / ग्रंथालय :

श्रीमंत बाळासाहेबांनी संग्रलयातील मौल्यवान वस्तूबरोबरच संग्रलयास उपयुक्त होतील अशा १५००० पुस्तकांचा संग्रह तसेच ३००० जुन्या हस्तलिखित पोथ्या यांचा संग्रह केलेला आहे. त्यातही चित्रकलेचे वाङमय अधिक प्रमाणात आहे. पोर्तुगीज, डच इत्यादी वसाहत वाल्यांची काही हस्तलिखितेही या ग्रंथालयात आहेत.

८.) प्रदर्शने :

विद्यार्थी व शिक्षक यांच्यांतही हस्तकौशल्य व उधोग्यप्रियता वाढण्यासाठी दरसाल ओउधोगिक प्रदर्शने भरविण्याचा सन १९१४ सालीं सुरु केले.

 

 

स्त्रोत : संदर्भ सूची | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
श्री यमाई श्री निवास हायस्कूल
श्रीराम पंचवटी देवस्थान व वस्तीग्रह
श्रीकेदारेश्वर देवस्थान व वस्तीग्रह
त्रिंबक-कला-भुवन
"भारत मुद्रणालय" औंध
ग्रंथालय
औंध हायस्कूलचा स्टाफ सन १९१२ इ.स.

१.) सूर्यनमस्काराचा प्रचार :

श्रीमंतांची साष्टांग नमस्कारांची चळवळ उल्लेखनीय आहे. हिंदुसमाजांत सूर्यनाम्स्कारांची प्रथा जरी अनादी असली तरी नवीन शिकलेल्या लोकांच्या गळीं नमस्कारव्यायाम श्री. बाळासाहेब ह्यांनी उतरविला हि गोष्ट नि:संशय आहे. पुरुषांबरोबर स्त्रीयांसही त्यांनी नमस्कार घालावयास लावले. सरकारी शाळेंतहि नामस्कारांचा व्यायाम त्यांनी प्रचलित केला. ह्यांचे सर्व श्रेय त्यांचे एकट्याकडे आहे. ह्या कार्यरूपाने महाराष्ट्रांत ते चिरकाल राहील.
सूर्योपासनामंदिरे :औंध संस्थानांत सूर्यनमस्कारांचा व्यायाम शाळानिहाय सक्तीचा करणेंत आलेला होता. त्याकरिता शाळागृहानजीक संस्थानांतील आटपाडी व कुंडल या तालुक्यांच्या गावीं सूर्योपासना-मंदिरें बाधण्यात आली होती.

* सूर्यनमस्कारांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !

 

 

२.) डोळ्यांचे व्यायाम :

नेत्रव्यायामाचे आणि मानेच्या व्यायामांचे एकूण २७ प्रकारांचे 'नेत्रबल संवर्धन' हें पुस्तक बाळासाहेबांनी लिहिले आहे. त्यामध्ये नेत्रानंचा व्यायाम कसा करावा याबद्दल सविस्तर वर्णन आहे. तसेच नेत्रामध्ये असणारे विविध भाग, त्यंची कार्ये व त्यंना होणाऱ्या व्याधी, व्याधीवरती करावयाचे उपाय या विषयी माहिती आहे.

३.) आहारशास्त्र :

आहारशास्त्रा वरती बाळासाहेबांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. पैकी आहार - चिकित्सा शिषक या पुस्तकात मनुष्याच्या दिनचर्येत जेवणाचे महत्त्व, त्याचे पचन, ते शरीरास पोषक आहे कि अपायकारक आहेत, शरीर प्रकृतीवर अपाय होऊन निरनिराळें होणारे रोग या विषयी श्रीमंत बाळासाहेबांनी चिकित्सकबुद्धीने लिखाण केले आहे.
मानवी देहाची रचना, अन्नाचा त्यावर होणारा परिणाम, आपल्या नित्य खाण्यांत येणाऱ्या पदार्थात जीवन द्रवें - व्हिटॅमीन्स - कोणती व त्यांचा शरीर पोषणाला कसा उपयोग करून घेंता येईल, अपायकारक आहार कोणता, त्याचा प्रकृतीवर कसा अनिष्ठ परिणाम होतो, व्यवसायपरत्वें कोणी कसा आहार घ्यावा, रोगी मनुष्यानें काय खावें आणि रोग परिहार कसा करून घ्यावा यांचे सांगोपांग विवेचन बाळासाहेब करतात.

४.) निर्व्यसनीपणा :

गुणांची ज्याला चाड आहे, त्याला व्यसनाधीन होऊन कसें चालेल ? कारण व्यसनें हीं गुनार्जनाच्या कमीं अडथळा आणतात. म्हणून गुणलुब्ध मनुष बहुधा निर्व्यसनी असतो. परंतु व्यसनात नमोडणारे काही धंदे अगर खोडकर चाळे मनुष्यमात्राला थोड्या बहुत प्रमाणाने असतात; त्यांच्यापासूनहि श्रीमंत बाळासाहेब अगदी अलिप्त होते. सुपारीच्या खंडाचेंहि त्यांना व्यसन नव्हते.

 

स्त्रोत : संदर्भ सूची | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
साष्टांग नमस्कार
सूर्योपासना-मंदिर
'नेत्रबल संवर्धन'

१.) चित्रकला :

बाळासाहेब महाराजांनी चित्र काढण्याचे स्वतःचे खास तंत्र विकसित केले. त्यांनी महाभारत, रामायणातील प्रसंगांवर काढलेल्या चित्रात त्यांची शैली दिसते. त्यांच्यावर लघुचित्रशैलीचा प्रभाव होता. पारंपरिक चित्रांपेक्षा काही वेगळे धाडसी प्रकारही त्यांनी चित्रात आणले. रामायणावरील त्यांच्या चित्रमालिकेत हनुमान हा अन्य वानरांप्रमाणेच साधा दाखवला आहे. हनुमानाला कुठेही दागिने अथवा मुकुट नाही. राम-लक्ष्मण वनवासात असताना त्यांच्या दाढी-मिशा वाढलेल्या असणार, हे लक्षात घेऊन त्यांच्या वनवासकाळातील चित्रांमध्ये श्रीमंतांनी त्यांना दाढी-मिशा काढल्या आहेत. अशा प्रकारची ही चित्रे दुर्मिळच म्हणावी लागतील. श्रीमंतांच्या चित्राचे संग्रहालयात वेगळे दालन आहे. त्यातील रामपंचायतन, जटायू वध, लंकादहन, हनुमान द्रोणागिरी पर्वत आणीत आहे, ही चित्रे उठून दिसतात. त्यांचे गाजलेले रामपंचायतन हे चित्रही येथे आहे. चित्ररामायण मालिका : श्रीमंत बाळासाहेब महाराज यांनी सन १९११ - १२ च्या दरम्यान स्वत: काढलेल्या चित्रमय रामायणाची कथा येथे पाहायला मिळते. महाराजांनी चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध ज्ञान घेतले न्हवते किंवा त्यांच्या चित्रकलेवरती कुठल्याहि एका चित्रशैलीचा प्रभाव नव्हता. त्यामुळेच त्यांच्या चित्रामधील वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणा जाणवल्या शिवाय राहत नाही.

२.) चित्रकारांना प्रोहत्सान व चित्रसंग्रह :

श्रीमंतांनी अनेक चित्रकारांनाहि आश्रय दिला. बंडोबा चितारी यांचे नातू रा. रामचंद्र दत्तात्रय चितारी यांना चित्रकलेचे शिक्षण मुंबईच्या स्कूल ऑफ आर्ट मधून करवून घेतले. तसेच बंडोबांचे एक चिरंजीव गोविंदराव यांना स्कॉलरशिप देऊन मोल्डींचे शिक्षण दिले आहे. या शिवाय महाभारताची व विभूतीयोगाची वगैरे चित्रे काढण्याकरिता रा. पूरम व नंतर कोट्याळकर या चित्रकारांना पगार देऊन आपल्या पदरी बाळगले होते. श्रीमंतांनी आपले पुत्र कै. राजेसाहेब आणि भाचे श्री दादामहाराज श्री बाळामहाराज यांसहि चित्रकलेचे शिक्षण दिले होते.

३.) शिल्पकला :

औंध संस्थांचे अधिपती श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव पंडित पंतप्रतिनिधी हे क्लाव्यासंगी असल्यामुळे चित्रकला, ललित कला, त्याच प्रमाणे शिल्पकला यांचेही चाहते होते. नुसत्या बाहेरील मूर्तिकारांकडून उत्कृष्ट शिल्पांचे नमुने विकत घेऊन व त्यांचा यथोचित गौरव करून समाधान होत नसल्याने त्यांनी औंध येथे स्वतंत्र मूर्तिकार खाते स्थापन केले.
मूर्तिकार चिमाजी पाथरवट व त्यांचा मुलगा असे दोघे मूर्तिकार होते. संगमरवरी मूर्ती बरोबर हस्तीदंती मूर्तींचे कामे होत. कै. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा अर्ध पुतळा पुणे येथे बसवला आहे, प्रिन्स ऑफ वेल्स यांचा पुतळा पुणे स्टेशनवर तर लेस्ली विल्सन यांचा अर्ध पुतळा अग्रीकल्चर कोलेज मध्ये असे अनेक पुथळे औंध मध्ये तयार झाले शिवाय असंख्य मूर्ती श्रीमंताच्या नजरे खाली बनत होत्या.

४.) फोटोग्राफी :

बाळासाहेबांनी फोटोग्राफीचे ज्ञान पुष्कळ संपादन केले होते त्यासाठी त्यांनी औंधास सामुग्री व सोय केली होती, फोटोग्राफीच्या साह्याने मॅजिक लँटर्नच्या स्लाईडस हि अनेक विषयांच्या व प्रवासंतील स्थळांच्या त्यांनी केल्या आहेत. ऑटोक्रोमच्या स्लाईडसच्या साह्याने देखावे नैसर्गिक रंगामध्ये पाहवयास मिळतात.
फोटोग्राफीच्या जोडीस लहान सिनेमा घेण्याचे कॅमेरे घेऊन त्याच्या साह्याने नमस्कार, कुस्ती, मल्लखांब, योगासने वैगेरेची चलचित्रे बनविली होती.

५.) अजिंठा ग्रंथ :

सन १९२७ साली बाळासाहेब हे महाराष्ट्रातील विविध नामवंत चित्रकारांना घेऊन अजिंठ्यास गेले व तेथील चित्रांच्या नकला करविल्या हे काम सहा महिने चालू होते स्वत: महाराज देखील बरेच दिवस तेथे थाबुन चित्रे काढत असत. गुहांमध्ये प्रकाशासाठी बाहेर मोठे आरशे लावून त्यांचा प्रकाश गुहेत पडला जात असे. पुढे या सर्व चित्रांचा अजिंठा नावाचा औंध प्रेस मध्ये ग्रंथ तयार केला त्यामध्ये महाराजांचे अजिंठा कलेवरती विस्तुत विवेचन देखील आहे. आणि निर्माण झालेल्या ह्या कलाकृती आज औंधच्या भवानी संग्रालयात एक निराळे अजिंठा दालन म्हणून त्यात ठेवण्यात आल्या आहेत.

६.) चित्र रामायण / शिवचरित्र / महाभारत ग्रंथ :

बाळासाहेबांनी स्वत: जलरंगात संपूर्ण चित्र रामायण रेखाटले आहे हे देखील संग्रालयात पहावयास मिळते या चित्ररामायणाचे ग्रंथ छापून घेतले होते. तर शिवाजी अल्बम भाग १,२,३ प्रत्येकी २०० प्रती औंध प्रेस मध्ये चापल्य होत्या शिवाजी या अल्बम मध्ये बाळासाहेब, धुरंधर व अन्य चित्रकारांची चित्रे पहावयास मिळतात. महाभारत ग्रंथ निर्मितीसाठी स्वत:चित्र काढून देण्याचे त्यांनी ठरिवले होते त्यासाठी असंख्य चित्रे त्यांनी काढली देखील होती.

७.) भवानी चित्र व वस्तू संग्रालय :

स्वतःच्या खासगी दौलतीतून जगाच्या कानाकोपऱ्यातून उत्तम कलाकृती, शिल्पे, दुर्मिळ वस्तू औंधला आणल्या. त्यातूनच त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी श्री यमाईदेवीच्या डोंगरावर अप्रतिम अशा "श्री भवानी चित्र-पदार्थ पुराणवस्तू संग्रहालया'ची निर्मिती केली. जमवलेल्या सर्व कलाकृती जतन करण्यासाठी व त्या लोकांना पाहता याव्यात, यासाठी आयुष्याच्या उत्तरार्धात भवानरावांनी १२ एप्रिल १९३७ रोजी श्री भवानी संग्रहालयाच्या वास्तूचे काम सुरू केले। ता. १२ जुलै १९३८ रोजी ते पूर्ण झाले. त्या काळी या वास्तूसाठी ७० हजार रुपये खर्च आला. या वास्तूच्या रचनेचा आराखडा स्वतः भवानरावांनीच तयार केला. युरोपच्या दौऱ्यात त्यांनी अनेक संग्रहालयांच्या इमारती पाहिल्या होत्या. त्यांचा अभ्यास केला होता. त्यातूनच त्यांनी फारसा डामडौल नसलेली; परंतु कलाकृती पाहण्यासाठी येणाऱ्यांचा पूर्ण विचार करून या वास्तूची रचना केली. संग्रहालयात एक प्रवेशद्वार आणि एक दिशामार्ग असल्यामुळे एका दालनातून दुसऱ्या दालनात जात चौदापैकी एकही दालन पाहावयाचे राहून जात नाही. वास्तुरचनेत प्रकाशाचा अतिशय कल्पकतेने वापर करून घेतल्यामुळे चित्रे व शिल्पे पाहताना वेगळा आनंद मिळतो. संग्रहालयात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करण्यात आला आहे. आता यासारखीच आणखी एक इमारत शेजारी आहे. त्या ठिकाणी चित्र-शिल्पांची नव्याने आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. सर्व चित्रे, शिल्पे आणि नानाविध वस्तू पाहून आपण संग्रहालयाच्या पायऱ्या उतरू लागतो, तेव्हा छोट्याशा संस्थानच्या कलाप्रेमी राजाच्या छंदातून उभे राहिलेले हे संग्रहालय पाहून मन थक्क होते.

* संग्रालयाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !

स्त्रोत : संदर्भ सूची | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
बाळासाहेबांनी काढलेले तैलचित्र
रा. एम.वी. धुरंधर यांचे 'शिवदरबार' हे चित्र
संगमरवरी मूर्ती
चित्र रामायण - बाळासाहेब
सैन्यभरती - बाळासाहेब

१.) कीर्तने :

श्रीमंत बाळासाहेब हें लेखक, वक्ते,चित्रकार, गायक, कीर्तनकार ह्या नात्यांनी त्यांनी लौकिक संपादन केला होता. श्रीमंत बाळासाहेब ह्यांचें नावं चिरकाल संस्मरणीय होण्यास त्यांची कीर्तनशैली मुख्यत: कारणीभूत आहे, त्यांची कीर्तनाची हौस अगदी स्वयंभू होती. कीर्तनकलेचा परिपोष करण्याकडे श्रीमंत बाळासाहेबांचें विशेष लक्ष होते. कीर्तनात प्रत्येक वाक्याचा, किंबहुना प्रत्येक शब्दाचा परिणाम श्रोत्यांवर व्हावा, अश्याविषयी ते दक्ष असत. एका कीर्तनाची सहा महिने तयारी करीत असतां परिणामकारक होण्याच्या दृष्टीने शब्दांचे व वाक्यांचे पालट सारखे चालू असत. ह्या परिणामकारकतेंत प्रसंगोचित अभिनयाची भर पडल्याने कीर्तनाला अनुपमेय रंग चढत असे. मोठा व गंभीर आवाज, तालबध्द गाणें, अनुरूप अभिनय आणि रसपोषक शब्दांची शब्दांची निवड, ह्यांमुळे श्रीमंतांचें कीर्तन अत्यंत आकर्षक होतें, त्यांच्या कीर्तनांतील दुसरा एक अपूर्व गुण म्हणजे प्रत्येक गोष्ट मार्यादेंत असत. अतिरेकदोष श्री बाळासाहेबांच्या कीर्तनांत कोणालाही आढळला नाही. हा दोष टाळण्याला एक प्रकारचें मन:संयम लागतें, तें पुष्कळांस साधत नाही. तसेंच सर्व कीर्तन नियमित वेलेंत यथास्थित रीतीने पुरें करण्याची हातोटी असामान्यच म्हटली पाहिजे.
औंधसंस्थानात श्रीमंतांनी पुष्कळच अनुयायी तयार केले आहेत. बालांपासून थोरांपर्यंत अनेक स्त्री-पुरुषांना औंधांत उत्कृष्ट कीर्तन करत असताना पाहून औंधचे सर्वच वातावरण कीर्तनमय असे. स्त्रियांना कीर्तनासाठी उत्तेजन व प्रोत्साहन महाज देत असत.

२.) व्याख्याने :

व्यायाम, नमस्कार, आरोग्य व आहार या विषयावर बाळासाहेब विविध प्रसंगी संपूर्ण भारतात व्याख्याने देत.

३.) देवालयें :

कै. श्रीमंत श्रीनिवासराव महाराज यांच्या कारकिर्दीत औंध येथील श्रीयामाई देवीचे देऊळ सन १९०१ साली पूर्ण झाले व पुढील सभामंडप बाधण्यास त्याच साली सुरुवात झाली होती. पुढे बाळासाहेब गादीवर आल्यावर त्यांचे कारकिर्दीत सन १९१० साली सभामंडप पुरा झाला. देवळास एकंदर ९४००० रुपये खर्च झाले असून सभामंडपास ६५००० रुपये खर्च झाले आहेत. सन १९२७-२८ साली श्रीचे सभामंडपात ग्वालेर पोट्रीजकडील व्हाईट व डेकोरेटेड टाईल्स बसविण्यात आली, टाईल्स वरील नक्षीचे डिझाईन औंधहूनच पाठविले होते. सभामंडपातील भिंती अजिंठ्याच्या चित्रकलेच्या धर्तीवर वेलपत्ती काढून व काही त्या चित्रांपैकी चित्रे काढून सुशोभित करण्यात आल्या. सभामंडपात श्रीमंतांनी स्वत: काढलेली श्रीकृष्णचरित्र, श्रीशिवाजी महाराज व सप्तशती व महाभारत यांतील चित्रे लावण्यात आलेली आहेत. सभा मंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर आर्ट कलेक्शन, लायब्ररी व म्युझियअम होते.
श्रीमंतांनी आपले स्वत:च्या खाजगी खर्चातून ३४,२७७,१४,६ ( चौतीस हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपये चौदा आणे आणि सहा पै ) मागून ६|७ हजार रुपये खर्च करून ४३२ पायऱ्या बांधिल्या आहेत. तर ५६०० रुपये खर्च करून पाण्याची योजना केली आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
बाळासाहेब यांची कीर्तनाची तालीम
धर्मभास्कर
श्रीयामाई देवी मंदिराचा सभामंडप

१.) उधोग-धंद्यांना प्रोहत्सान :

किर्लोस्करवाडी : खरं म्हणजे कुंडलचा एक भाग म्हणजेच किर्लोस्करवाडी. कुंडलरोड हे स्टेशन आणि त्या जवळची औंध सरकारची जमीन आपल्याला पाहिजे, असं म्हणून औंधच्या राजेसाहेबांना लक्ष्मणराव किर्लोस्करांनी नकाशावर एक वर्तुळ काढून नक्की कोणती जमीन हवी ते दाखवलं. हे वर्तुळ हीच प्रत्यक्ष सीमा मानून औंध सरकारने तेवढी जमीन किर्लोस्करांना दिली. मग त्या भूभागाला किर्लोस्करवाडी म्हणायला लागले. ही जमीन देताना कारखाना काढायला भांडवल म्हणून औंधच्या राजेसाहेबांनी १० हजार रुपयेदेखील लक्ष्मणरावांना दिले होते.
ओगलेवाडीतील ओगले ग्लास वर्क्स आणि साबण निर्मितीचा कारखाना, किन्हईतील पराडकरांची "सुगंधी शाळा" तसेच पाटणकरांचा औषधी कारखाना आणि दिघंची येथील जिनिंग फॅक्टरी अश्या प्रकारच्या असंख्य उधोग-धंद्यांना प्रोहत्सान बाळासाहेब यांनी दिले.

२.) पहिल्या लोकराज्याचा निर्मिता :

श्रीमंतांनी आपल्या राज्यांत प्रातिनिधिक सभा स्थापन करून जो दूरदर्शीपणा व लोकच्छंदानुवर्तित्व प्रत्ययास आणलें, औंध संस्थानांत ग्रामपंचायती, गांवसभा, सगळ्या हिंदुस्थानात न आढळणारी अशी न्यायपद्धती सुरु करण्यात आली होती. म्हणजे बऱ्याच खटल्यांत लोकांना पंच म्हणून न्यायाधीशाबरोबर बसण्याचा हक्क मिळाला होता.
१९३८ ते १९४७ हिंदुस्थानचे स्वराज्य निर्माण होई पर्यंतचा काळ बाळासाहेबांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा व विधायक कार्यात गेला. बाळासाहेब खेर यांच्या हस्ते औंधच्या स्वराज्यदानाची सुरुवात झाली आणि त्यादिवशी औंधचा भगवा आणि हिंदुस्थानचा तिरंगा झेंडा यांचे एकाच ध्वजस्तंभावर ध्वजारोहण झाले. त्या वेळी औंध संस्थानची नवीन राज्यघटना हि हिंदवी स्वराज्याची प्रयोगशाळा होती. 'मी जनतेचा पहिला सेवक आहे' असे बाळासाहेबांनी सांगितले.

३.) सुताच्या रूपाने सारा :

औंध संस्थान मध्ये बाळासाहेबांनी सुताच्या रूपाने सरकारला शेतसारा भरण्याची शेतकऱ्यांना सवलत दिली होती ती अस्सल स्वदेशी व महत्त्वाची वाटते.

४.) ग्रामपंचायती :

पूर्वी खेडीं आपले गांची व्यवस्था उत्तम रीतीने बघणारीं सुसंघटीत लहंशीं राज्येंच होतीं. त्याप्रमाणे खेडी सुसंघटीत होण्याची पहिली पायरी ग्रामपंचायतीची स्थापना होय. हें श्रीमंतांनी जाणून ग्रामपंचायतीची स्थापना १९१६ सालीं केली.
सन १९१६ सालीं पंचायतची स्थापना झाली, तरी लोकांना मार्गदर्शक असे नियम नव्हते. तें १९१९ सालीं करून पुअस्तक तयार केलें. या ७७ कलमी नियमांत ग्रामपंचायतींची निवडणुकीची पध्दत, त्यांचीं कामें, कामकरण्याची रीत सांगितली होती. पंचायतीत दहा पंच व एक सरपंच मिळून अकरा जणांची पंचायत असत. सन १९२६ सालीं प्रातिनिधिक सभेने कांहीं दुरुस्त्या करून या नियमांना कायद्याचे स्वरूप दिलें. या दुरुस्तीत विशेष लिहण्या सारखी गोष्ट म्हणजे स्त्रियांना पंच म्हणून निवडून देण्याचा अधिकार देण्यात आला.

५.) दवाखाने :

८ जानेवारी १९३४ रोजी 'दि किंग एडवर्ड हॉस्पिटल' हा दवाखाना उभारला या दवाखान्यात नवीन पद्धतीची सर्व आधुनिक शास्त्रक्रियेची हत्यारे वगैरे सामुग्री पुरवली होती. येथे ऑपरेशनची फुकट सोय या सद्हेतूने सर्वांगपरिपूर्ण अशी सोय करण्यांत आली.

६.) गो हत्या बंदी कायदा :

सन १९१२ साली गोवध बंदीचा जाहीर नामा प्रसिध्द केला त्यामध्ये गो वधासाठी विक्री वरही बंदी आणली एवढे करून बाळासाहेब थांबले नाहीत तर गो संवर्धनासाठी ज्या गावामध्ये गाय वाचून एकही घर मोकळे राहू दिले जाणार नाही त्या गावच्या लोकांना एक वर्षाचा सारा माफ करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

७.) अस्पृश्यता कायदा :

सामाजिक बाबतीत अस्पृशता-निवारण झालेले होते व शाळेत तर मुळीच विटाळ मानला जात नव्हता. संस्थानातील कित्येक गावांमध्ये अस्पृशांना पाणी भरणे वगैरेचे हक्क मिळाले होते. औंधळा तर खुद्द श्रीयामाईचे मंदिरात सर्व लोकांतून येऊन श्रीमंतांच्या हातातून बक्षिसे, शिफारस पत्र वगैरे घेऊन जाणारे अस्पृश कितीतरी वेळा दिसत. लहान मुलांना तर अस्पृशतेची जाणीव देखील नव्हती.
आरोग्यदिनासारख्या प्रसंगी तर श्रीमंत स्वत:व श्री. सौ. राणीसाहेब अस्पृश्यांच्या घरी जाऊन त्यांची घरे आंतून पाहून येत. राणीसाहेब हळदी- कुंकू सामारंभात अस्पृश बायकांना बोलावून त्यांना चांदीचे करंडे वैगेरे देत. त्यांच्या या कार्याची दखल खुद महात्मा गांधी यांनी घेतली होती.

८.) खुल्या तुरुंगाचा यशस्वी प्रयोग :

औंध संस्थान काळात आटपाडी, कुंडल, गुणदळ येथे लॉकप्स व औंध येथे जेल होते. तेथील कैद्यांना महाराज सत्तेवर येण्यापूर्वी फक्त सडकदुरुस्तीची कामे त्यांना दिली जात. पण महाराज सत्तेत आल्यानंतर, कैदी लोकांपैकी ज्याची बुद्धी ज्या कलाकौशल्यामध्ये चलते, अशांकडून तसेच धंदे औंध जेलमध्ये करून घेण्यात येत. पुढे सतरंज्या तयार करणे, गालिचे, वेताच्या खुर्च्या बनवण्याचे काम सुरु झाले.
गुन्हेगारांचे पुनर्वसन करून त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी या हेतूने बाळासाहेबांचे चिरंजीव बॅ. अप्पासाहेब पंत व मॉरीस फ्रीडमन यांनी खुल्या तुरुंगाची संकल्पना बाळासाहेबांना सांगितली व त्याप्रमाणे स्वतंत्रपूर नावाने आटपडी येथे एक स्वतंत्र वसाहत निर्माण करून त्यामध्ये काही ठराविक गुन्हेगारांस ठेवले जात, ज्यांना शेतीची आवड आहे त्यांच्या कडून मळे फुलवले जावू लागले, काही गवंडी तयार झाले. त्यातील काही वाकबगार व्यक्ती तुरुगामाध्येच शिक्षक म्हणून शिकवू लागले एकंदर कैद्याच्यातील उद्योगाची आवड निर्माण झाली व चोरी / गुन्हे करण्याची भावना अपोआप नष्ट होत गेली.

९.) क्रांतीकारकांना आश्रय :

क्रांतीयुद्धाचे सातारा जिल्हा हे केंद्रच बनले होते. नाना पाटील, लाड हे लोक त्यात कार्यरत होते. त्यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकार शिकस्त करीत होते. हे भूमिगत औंधला आश्रय घेत होते. कदाचित औंध संस्थान इंग्रज खालसा करू असे बोलत होते पण औंधची प्रजा आणि औंधचे राजे हे स्वतंत्रच्या लढ्यात अप्रत्यक्ष / प्रत्यक्ष सहभागी होतेच.

१०.) ग्लायडिंग निर्मिती :

इंडियन ग्लायडिंग असोसिएशन हे १९३२ साली औंध येथे महाराजांनी स्थापन केले. विमान गृहनिर्मितीवर शिक्षणाचा व विमान रोहनचा पहिला प्रयत्न होता. रा. काबाली यांनी औंधच्या महाराजांना ग्लायडर बनवून दिले व विमान उड्डाणाचा पहिला प्रयोग ९ जानेवारी १९३२ रोजी पार पडला श्रीमंत अप्पासाहेब यांनी विमानविध्येचे शिक्षण कराची येथे घेतले तेथून ते औंधला विमानानेच आले. येताना पहिले भारतीय एअर पार्सल घेऊन आले. दक्षिणेतील पहिले वैमानिक राजपुत्र म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यानंतर बाळासाहेब महाराज हे ग्लायडर विमानातून परळ,सातारा, परंडा, किन्हई, किर्लोस्कर वाडी, पंढरपूर ला गेल्याचे उल्लेख आहेत.

११.) संयुक्त दक्षिणी संस्थान निर्मिती प्रयत्न :

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्या नंतर देशी संस्थानिकांची स्थिती काय होणार, याबद्दल पुष्कळ शंका कुशंका लोकांच्या मनात येत आणि ४५-४६ पासून त्या येऊ लागल्या. त्यानंतर दक्षिणेतील संस्थानातील प्रजा - परिषदांनी ठराव करून जमखिंडिस अधिवेशन घेतले. त्यात सगळ्या दक्षिणी संस्थानांचे एक संघराज बनवावे आणि जनतेकडे सर्व राजेलोकांनी अधिकार द्यावेत अशी एक घटना केली होती. परंतु अनेक कारणांमुळे ती यशस्वी होऊ शकली नाही.
या संघ राज्याच्या संकल्पनेत अनेक राजेलोक सहभागी झाले होते पण प्रत्यक्षात जेव्हा दि. २० डिसेंबर १९४७ रोजी मिरजेस संघ राज्याची घोषणा झाली त्यावेळी काँग्रेसच्या वतीने आलेले कमल नयन बजाज यांची अध्यक्ष स्थानी योजना करण्यात आली होती. समारंभात पहिले राज्यप्रमुख या नात्याने त्यावेळी बाळासाहेबांचे संस्मरणीय भाषण झाले वातावरण सकारात्मक होते. पण बजाज यांच्या भाषणात काँग्रेसच्या विरोधाची चिन्हे स्पष्ट दिसल्याने व सांगली, मिरज आणि फलटणच्या राज्यांची रात्री गुप्त बैठक होऊन हा प्रयत्न हाणून पडला गेला.
स्त्रोत : संदर्भ सूची | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
किर्लोस्करवाडी
महात्माजीं सोबत
१ ली ग्रामपंचायत
पहिली प्रातिनिधिक सभा
एडवर्ड VII हॉस्पिटल, औंध
ग्लायडर उड्डाण
बाळासाहेबांचे विमानोड्डाण
औंध येथे तयार झालेले ग्लायडर
औंध येथे तयार झालेले ग्लायडर
श्रीमंत बाळासाहेब हे लेखकही होते त्यांचे विविध विषयावरील लिखाण हे जनतेसाठी ज्ञानामृतच होते त्यांच्या लिखाणाचे विषय देखील समाजोपयोगी होते अतिशय दर्जेदार लिखाण होते त्यांची इतिहास या विषयात विशेष रुची होती, त्यांच्या आत्मचरित्राचे दोन खंड खूप प्रसिद्ध झाले होते काही काळ त्यावर बंदी देखील होती परंतु काही ठराविक लोकांचेच आत्मचरित्र एवढे लोकप्रिय झाले होते त्या मध्ये हे अत्म्चारीत्राची गणना होते. त्याशिवाय नेत्रबलसंवर्धन हे डोळ्यांची निघा, व्यायाम याविषयावरील पुस्तक देखील प्रसिद्ध आहे, साष्टांग नमस्कार हे पुस्तक तर पूर्ण जगभर खपाचे विक्रम मोडत होते. त्याच बरोबर स्फुट-लेख-संग्रह, आदित्यहृद्य अशी असंख्य पुस्तके त्यांनी लिहिली.
साहित्यातील त्यांच्या कामगिरीमुळेच सन १९३५ च्या इंदूर येथील मराठी साहित्य संमेलनाचे आध्यक्ष्य होते.
स्त्रोत : संदर्भ सूची | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
बाळासाहेब लेखण करीत असताना

बाळासाहेबांच्या राज्यातल्या अलौकिक न्यायाची हकीकत.

सातारा शहराजवळील किन्हई नावाच्या खेड्यात महाराजांचा एक सुंदर राजवाडा आहे. साखरगडनिवसनी देवीचे एक देवस्थानही नजीकच्या टेकडीवर आहे. त्या देवीची पूजा, नैवेद्य व वाड्याची देखभाल करण्यासाठी संस्थांचा एक कारकून किन्हईच्या वाड्यात नेमलेला असे. काही वर्षे माझे वडील या कामावर होते. आम्ही राजवाड्यातच राहत असू. माझ्या आईने गावचीच एक ब्राह्मण विधवा स्वयंपाकासाठी म्हणून नोकरीला ठेवली होती.
ती विधवा कुणाच्या तरी मोहाला बळी पडली. पुरे दिवस भरेतोपर्यंत तिने आपले गुपित जीवापाड जतन केले. अंती समाजाच्या भीतीने आपल्या अनीतीजात अर्भकाचा गळा दाबून प्राण घेतला. मुलाचे कलेवर राजवाड्याच्या खोल नाल्यात फेकून दिले. हे सारे कृत्य त्या बापडीने केव्हातरी अपरात्री केले. वधाला वाचा फुटली. किन्हईच्या ठाणे-अम्मलदाराने बाईला अटक केली.
खटला औंधला चालला. मला आठवते, रा. सा. द. ग. कुलकर्णी हेच न्यायाधीश होते. स्त्रीच्या अपराधाचा खटला ऐकण्यासाठी त्या वेळी पाच स्त्रिया असेसर्स म्हणून नेमल्या गेल्या. खटला रीतसर चालला. साक्षीपुरावे झाले. सारे झाले. बाई मात्र निर्दोष सुटली. इतकेच नव्हे तर पोटाची खळगी भरण्यासाठी त्या निराधार स्त्रीने परत पापाचरणाकाडे वाळू नये म्हणून, तिला एक कायमची नोकरी देवविण्यात आली. ती नोकरीही तिची सामाजिक प्रतिष्ठा ( तिच्या कल्पनेप्रमाणे ) तिला परत लाभावी अशी. श्रीसाखरगडनिवासिनीच्या देवळातील सेवेची.
कायद्याचा कीस काढण्यापेक्षा निर्दोष न्यायदान कसे होईल हे त्या राज्यात पहिले जात होते. मनुष्य मुळात गुन्हेगार मुळीच नसतो. प्राप्त परिस्थिती, क्षणिक भावनेचा उद्रेक, अन्यायाची चीड अशी अनेक करणे अपराध्याच्या अपराधामागे असू शकतात, हे जाणण्याइतके औंधच्या तत्कालीन राज्यकर्त्यांचे मन विशाल होते.
- गदिमा.

पहिला सार्वजनिक शिवजयंती सोहळा :

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली असे आपण नेहमी ऐकतो , सांगतो. त्यातील शिवजयंती उत्सवाच्या प्रारंभाची ही कहाणी...
१८१८ मध्ये पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांची प्रेरणास्थाने नष्ट करण्याचा इंग्रजांनी सपाटा लावला. पेशवे साम्राज्याचे वैभव असलेला शनिवारवाडा जाळून टाकला. मराठ्यांचे
किल्ले नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली. या सुलतानी हल्ल्यात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडही उद्ध्वस्त झाला.
जेम्स डग्लस या इतिहासकाराने अभ्यासक म्हणून रायगडाला भेट दिली. स्वराज्याच्या राजाच्या समाधीची दैनावस्थेची त्याने लोकांपुढे आणली. त्याच्या त्या बोलण्याने महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात अंजन पडले आणि शिवजयंतीचा उत्सवाची संकल्पना आकार घेऊ लागली.
न्या. महादेव गोविंद रानडे यांनी २४ मे १८९५ रोजी पुण्यात जाहीर सभा घेऊन शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न हाती घेतला. त्यासाठी मंडळ स्थापन करून टिळकांना त्याचं चिटणीसपद देण्यात आलं. टिळकांनी रायगडावर २५ एप्रिल रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्याचं निश्चित केलं.
एप्रिलपासून या शिवजयंती उत्सवाबद्दल त्यांनी केसरीमध्ये लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या लेखनास लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. औंध संस्थानाचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तिला महाराष्ट्रातील सरदारांकडून पाठिंबा मिळाला.
या संकल्पाला राष्ट्रीय सभेचा (कॉंग्रेसचा) पाठींबा मिळावा यासाठी रे मार्केट येथे सभा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्याच्या अध्यक्षपदी होते. अशा प्रकारे संपूर्ण भारतभर शिवजयंतीच्या उत्सवाचे वातावरण निर्माण झाल्यावर ठाण्याच्या कलेक्टरने परवानगी नाकारली , पण टिळकांची जिद्द कायम होती.
टिळक त्यावेळी मुंबई कौन्सिलच्या सदस्य होते. साहजिकच त्यांच्या शब्दाला वजन होते. त्यामुळे मुंबई इलाक्याचे गव्हर्नर लॉर्ड सॅण्डहर्स्ट यांची इच्छा नसूनही टिळकांच्या जिद्दीपुढे त्याला या उत्सवाला परवानगी द्यावीच लागली आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सवापुढचे सारे अडथळे दूर झाले.
२५ एप्रिलचा तो ऐतिहासिक दिवस उजाडला. उत्सवाचे यजमानपद अर्थातच महाडकरांकडे होते. फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर अवघ्या भारतभरातून लोक महाडमध्ये जमले. दिवस मावळतीला चालला आणि हे सारे शिवप्रेमी गडावर चढू लागले. मशालींच्या प्रकाशात हे हजारो शिवप्रेमी एक नवा इतिहास घडवण्यासाठी रायगड सर करत होते.
गडावर पोहचल्यावर विनायक अंभ्यंकर यांचे किर्तन , शिवराम परांजपे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आणि लोकमान्य टिळकांचे भाषण झाले. यावेळी टिळक म्हणाले , युरोपात क्रॉमवेल , नेपोलियन बोनापार्ट आदी लोकोत्तर विभूतींची स्मारके आहेत. तसेच महाराष्ट्राला स्वाभिमानाची दीक्षा देणा-या शिवछत्रपतींचे स्मारक आपल्याला रायगडावर उभारायचे आहे. त्या रात्री जगदीश्वर मंदिरातून मोठा छबिनाही काढण्यात आला.

जर्मन वॉरमधील श्रीमंत व औंध संस्थांची मदत :

सन १९१४ सालीं जर्मन वॉर सुरु होतांच श्रीमंतांनी ब्रिटीश सरकारस जरूर तें साह्य देण्याचें मोठ्या आनंदाने ताबडतोड कळविलें. सन १९१७ | १८ सालापर्यंत संस्थांची व रयतेची मिळून वॉरलोनची रकम २,६३,९९८ रुपये पाठविण्यात आली होती तर स्त्रियांच्या वतीने २५०० रुपये पाठविले होते. तर ५५ लोक रिक्रूट म्हणून आणि दुसरे वॉरलोन म्हणून श्रीमंतांनी २५००० रुपये पाठविले. इंपिरियल इंडियन फंडासाठी संस्थान कडून २००० रुपये पाठविणेंत आले.
महायुद्धाचे कमी औंध संस्थानने जी मदत केली त्याचे आठवणीदाखल म्हणून संस्थानास महायुद्धांत जिंकलेले हत्यारांपैकी २ मशीनगन्स, २७ संगिनी, ४२ रायफल बंदुकी, १ पिस्तुल, ३ शिरसत्राणें ( हेल्मेट्स ) याप्रमाणे वॉर-ट्रोफिज सन १९२३ | २४ सालीं इंग्रज सरकार कडून देण्यात आल्या.
स्त्रोत : संदर्भ सूची | बाळासाहेब पंतप्रतिनिधी.....
राज्यारोहणाच्या दिवशीचे छायाचित्र
१९११
'आम्ही जातो आमुच्या गावा...'