मानवाच्या घराला घरपण तिथल्या वस्तूंनी, घरातील व्यक्तींनी आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या सुंदर नाते- समंधानी येते.
पक्षांच्या घरट्यात सुद्धा 'खोप्यामध्ये खोपा सुंदर सुगरणीचा असतो.
मुंग्यांच वारूळ जरी घेतलं तरी प्रत्येक बारीक बारीक मातीचे ढिगारे आणि त्यांना असणारी कित्येक भोके यामुळे ते वारूळ सुद्धा महलाइतकच डोलदार दिसतं.
औंध या गावाला सुद्धा कस्तुरी प्रमाणे सुगंधी बनवलय ते तिथल्या कार्यक्रमांनी.
कार्यक्रम : औंध... लोकोत्सवाचा एक सोहळा !

औंध ......... एक लोकोत्सवाचा सोहळा !

 

भगवतीभक्त जेव्हा गर्दी करून जगदंबेचा उधो उधो म्हणत जयघोष करतात तेव्हा गुलाबी रंग आसमंत बहरुण टाकतो.
नवसाचे कौतुकाचे दीप ...
दीपमाळेवर ज्योत पेटवण्यास सर्वांची घाई, तसेच रथाची रस्सी खेचण्यास चढाओढ,
मनात दाटलेली भक्ती आणि एकच ओढ ...
प्रत्येक मंदिराला भेट देणारा ' छबिना ' व त्याचा डौल यांचा रंग वेगळा,
कुणी यात्रेतील तमाशा पाहताना लहरीवर डोलतो क्षणात फेटा सुद्धा वर उडतो ...
तर कुणी कीर्तनातील स्वरांचा ताल ऐकताना तल्लीन होऊन टाळ नसेल रती हाताची टाळी वाजवतो.
तरुणाई धाव घेते ती कुस्तीच्या फडात ...
कोण मर्दानगीचा शड्डू ठोकतो आणि कोण पडतो ...
भरधाव धावणाऱ्या बैलाच्या शर्यतीतील ढवळ्या - पवळ्याचं कौतुक तर निरांजणाच्या वाती, गुलाल उधळून होते...
औंधच्या बैलशर्यती जशा आकर्षून घेणाऱ्या तसचं बैलबाजार एक आवडीची बैलजोडी मिळवण्याचं हक्काच ठिकाणं...
चित्रकला, रांगोळी, सजावट, स्वच्छता या स्पर्धा घरच्याचं पण क्रिकेटनही नव्याची चाहूल या स्पर्धेत दिली आहे.
औंध आणि औंधची यात्रा बालका पासून वृद्धापर्यंत सर्वांनाच आपलीशी वाटणारी .....

 

संस्थान कालीन यात्रा :

औंध येथे दरवर्षी एक पौष शु. १५ स व एक अनंत चतुर्दशीस अशा दोन यात्रा भरत होत्या. पैकी पौषाची यात्रा ही मोठ्या प्रमाणावर भरत कारण यात्रेमध्ये बैल, गाई, म्हशी, घोडे वगैरे विक्रीकरितां दूरदूरचीं, नामांकित जनावरें येत असून त्यांची संख्या अजमासे १५ | १६ हजारांवर जाते. शिवाय कापडाचीं, स्टेशनरीचीं, भांड्याचीं, कांचेचीं, हलवायचीं वगैरे सर्व प्रकारच्या मालाचीं दुकानें येत असतात. सदर यात्रे मध्ये अजमासे ३ | ४ लाख रुपयांची घडामोड होते. पौर्णीमेच्या दिवशीं श्रीची दीपमाळ पाजळली जाऊन प्रतिपदेच्या दिवशीं श्रीची रथांतून मिरवणूक निघत. सदर यात्रेंतील नामांकित व अस्सल जातींच्या बैलांचें व गाईचें त्याचवेळीं प्रदर्शन भरून त्यांतील उत्तम जनावरांस श्रीमंत बाळासाहेब यांचे हस्ते बक्षीस दिलें जात होते. त्याच प्रमाणें नामांकित पहिलवनांच्या कुस्त्या करविल्या जाऊन श्रीमंतांच्या हस्ते योग्य ती बक्षिसें दिलीं जात होती.

 

सध्याच्या यात्रेचे स्वरूप :

श्री यमाईदेवी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, औंध आणि कृषि उत्पन्न बाजार समिती, वडूज यांच्या संयुक्त विधमाने अलीकडे हि यात्रा १५ दिवस भारीवली जाते, विशेष म्हणजे जनावरांची जंगी यात्रा असते. विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते, या यात्रेला गेल्या वर्षीच १०० वर्षे पूर्ण झाले आहेत, यात्रेमध्ये बाहेरून येणारे दुकानदार, यात्रेकरू व शेतकरी यांची सोय तसेच यात्रेकरूना दिवाबत्तीची सोय, आरोग्य, पिण्यासाठी मुबलक पाणी ग्रामपंचायतीच्यावतीने व मार्केट कमिटीच्यावतीने पुरवण्यात येते.

१. दीपोत्सव (यमाई देवी छबिना) :

दर पौष महिन्यात दररोज 'भोगी' केली जाते. त्यावेळी मंत्र पुष्प, दही, दुध आदी पूजा साहित्यासह देवीची षोडषोपचारे महापूजा बांधली जाते. पौष पौर्णिमेच्या दिवसी श्री यमाईदेवीची पालखीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणूकीस 'छबिना' असे म्हणतात. पालखी पुढे तेलभूती, दिवटे, आराधी गोंधळी, डवरी, घडशी, डोंबारी व इतर आपली सेवा देवीस अर्पण करतात. 'आई उदे ग अंबे उदे !' या जागराने परिसर दुमदुमून जातो. छबिन्याच्या दिवशी सायंकाळी पालकी निघण्याच्या वेळी श्री यमाई मंदिराच्या परिसरात असणारी अति भव्य महाराष्ट्रातील सर्वात उंच ( ६५ फुट ) आकर्षक दगडी दीपमाळ प्रज्वलित केली जाते.

२. रथोत्सव :

पौर्णिमेच्या ( छबिन्याच्या ) दुसऱ्या दिवशी मध्यानीच्या सुमारास श्री यमाईदेवीची षोडषोपचारे पारंपारिक पद्धतीने पूजा अर्चा करून पंतप्रतिनिधी देवीची उत्सव मूर्ती रथा मध्ये ठेवतात व श्री यमाईदेवीच्या वार्षिक उत्सवातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रथोत्सव सोहळ्याचा शुभारंभ होतो. रथ ग्रामप्रदक्षिणासाठी निघतो. हा देवीचा रथ लाकडी तीन मजली अतिशय सुबक नक्षीकाम असणारा आहे. देवीचे भक्तगण नवसाच्या नारळाचे तोरण व नोटांच्या माळा या रथास बांधतात. रथाच्या पुढील दोन्ही बाजूस दोन दोरखंड बांधलेले असतात त्याच्या साह्याने ग्रामस्त व भाविक हा रथ ओढतात. रथापुढे देवीचा मनाचा गजराज व घोडे मोठ्या दिमाखाने डोलत चालत असतात. रथापुढे ढोल, लेझीम, झांजपथके असतात. श्री.श्री. विध्यालयाचे व त्रिमली वाघजाई देवी विध्यालयाचे झांजपथक व लेझीमपथक हे मिरवणुकीचे खास आकर्षण असते. इतर गावोगावातील काही कलाकार आपली कला सदर करीत असतात. रथ ग्रामप्रदक्षिणा करून ग्रामतळ्यावर येतो व ब्राह्मणी घाटाला श्री यमाई देवीच्या उत्सव मूर्तीला षोडषोपचारे स्नान घालून पूजा करून देवी तळ्यावरील 'मोकळाई' देवीच्या भेटीत्सव काही काळ विश्रांती घेते व नंतर रथाची ग्रामप्रदक्षिणा पुढे चालू होते.
सायंकाळी रथ गावातील श्री यमाईदेवीच्या महाद्वारा समोर आल्यावर देवीची मूर्ती पालखीतून मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावर देवीची पूजा आरती पारंपारिक पद्धतीने होऊन गुलाल खोबऱ्याची उधळण करून 'आई उदे गं अंबे उदे' च्या घोषात रथोत्साव कार्यक्रमाची सांगता होते.

३. स्पर्धा ( क्रिकेट सामने, प्राण्यांचे व पक्षांचे प्रदर्शन, बैलगाडी शर्यत (आड्डा), कुस्त्यांचे जंगी मैदान ) :

यमाई देवी छबिना, दिपोत्सवाने यात्रेला सुरुवात होते व पुढे यात्रेत क्रिकेट सामने, शरीरसौष्ठव स्पर्धा, भव्य श्वान स्पर्धा, भव्य व्हॉली बॉल स्पर्धा, बैलगाड्यांच्या शर्यती ( आड्डा ), कृषी प्रदर्शन, जंगी कुस्त्यांचे मैदान ( आखाडा ) व जातीवंत जनावरांचे प्रदर्शन असे स्पर्धात्मक विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असते.

४. सांस्कृतिक कार्यक्रम ( विभागीय संगीत भजन स्पर्धा ) :

दरवर्षी पौष वैध ५ ला शंभोपुरी मठाचे अधिपती ॐ ब्रह्यचैतन्य तपो. प.पू. श्री हिरापुरी महाराजांच्या पुण्यतिथी प्रत्यर्थ मठाचे विध्यमान अधिपती श्री शामपुरी हिरापुरी गोसावी महाराज हे विभागीय ( सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,पुणे ) संगीत भजन स्पर्धचे आयोजन गेली १२ वर्षे करीत आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात २००१ ला जिल्हास्तरीय स्पर्धेतून झाली आज मितीस हीच स्पर्धा राज्यस्तरीय झाली आहे.
१९७१ साली ब्रह्यचैतन्य तपो. प.पू. श्री हिरापुरी महाराजांचा मृतू झाला हे वर्ष ४१ वा स्मृतीदिन साजरा झाला.
पौष वैध ४ व ५ ला हा कार्यक्रम होतो. बाल, पुरुष आणि महिला अश्या तीन गटामध्ये १२ वर्षवा तापोस्मृती सोहळा पार पडला ५० पेक्षा जास्त मंडळांचा सहभाग होता. प्रथमच राज्य स्तरीय स्पर्धचे नियोजन होते.

५. बैल बाजार / जातीवंत जनावरांचे प्रदर्शन :

औंध संस्थान काळात कै. बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी दर शनिवारी औंध येथे बैल बाजार सुरु केला कारण मंगळवार हा दिवस देवीचावार असल्याने दर मंगळवारी औंधला आसपासच्या गावातील लोक दर्शनासाठी येत असल्याने या दिवशी पाजीपाला व इतर व्यवसायांचा बाजार भारत असे लोकांच्या सोयीसाठी मंगळवारच्या बाजाराचे हे वैशिष्ट आहे तर शनिवारी बैल, शेळ्या, मैशी वगेरे इत्यादी जनावरांचा बाजार भारत असे हे बाजार तालुक्यातील पहिले बाजार ठरले आहेत.
संस्थान विलीनानंतर पुढे बऱ्याच वर्षांनी म्हणजे १९६३ मध्ये सरकारी कायद्या प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती वडूज येथे झाली व हे बाजार या समितीच्या अधिकाराखाली काम करू लागले त्यामध्ये ग्रामपंचायत आधी काम पाहत होती व नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती काम पाहते फरक असकी गावोगावी बाजारांची मागणी होऊ लागल्याने त्याप्रमाणे परवानगी देण्यात येऊ लागली बाजारांचे प्रमाण वाढले परिणामी औंध येथील जनावरांच्या बाजारात प्राण्याचे प्रमाण घटले गेल्याने शनिवारचा बाजार बंध झाला व मंगळवारच्या बाजाराशी जोडला गेला.
वार्षिक यात्रा पौष महिन्यात पंधरा दिवस भरते यामध्ये बैल बाजार फार मोठ्या प्रमाणावर भरतो संपूर्ण महाराष्ट्रातून चांगल्या प्रतीची जनावरे येत असतात त्यामध्ये प्रामुख्याने बैल, गाय, म्हैशी, घोडे व इतर जनावरांचा समावेश असतो लहान मोठ्या जनावरांची उलाढाल होते यात्रेच्या कालावधीत राहण्याची, दिवाबत्तीची, पाणीपुरवठ्याची, आरोग्याची व लसी करणाची सोय कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, सा. जि. प. पशुसंवर्धन खाते यांच्या मार्फत केले जाते.
यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर नामांकित जातिवंत जनावरे येतात, कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते, शेतकरी, व्यापारी यांचे व्यवहार सुरळीत होतात. वैशिठ्य असे कि, जातिवंत जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येते या मध्ये बक्षिसे दिली जातात, जनावरांच्या मालकांना चागल्या प्रकारे जनावरे जोपासल्या बद्दल प्रमाणपत्र दिली जातात.
अलीकडेच कृषी प्रदर्शन देखील खास आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

६. मनोरंजन :

तंबूतील सिनेमे हे औंध यात्रेतील मनोरंजनाचे खास वैशिठ्य असले तरी त्या बरोबर तमाशे, लोकनाट्ये, सर्कशी, विविध खेळ, मोठमोठे आकाश पाळणे, इलेक्ट्रोनिक गाड्या, असे अनेक करमणूकीची साधने यात्रेचे आकर्षण ठरत आहेत.

७. इतर आकर्षणे :

मेवा मिठीची, फरसाण, जेलेबी, गोडीशेव, बत्तासे, चिरमुरे अश्या प्रकारच्या खाउंची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, जीवनावश्यक गृहपयोगी , शेतीस लागणाऱ्या वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी होतात. गरम गरम जिलेबी व सातारी कंदी पेढे हा या यात्रेतील खास पदार्थ आहेत.
स्त्रोत : संदर्भ सूची | कार्यक्रम.....
औंध, श्री यमाई देवीची यात्रा
औंध दीपोत्सव
औंध दीपोत्सव
यमाई देवी छबिना
यमाई देवी रथोत्सव
संगीत भजन स्पर्धा
बैलगाडी शर्यत (आड्डा)
तंबूतील सिनेमे
जागतिक सूर्यनमस्कार दिन व कै. श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे दरवर्षी रथसप्तमीला आयोजन केले जाते. हि स्पर्धा श्री यमाई स्टेडियमवर ६ गटांमध्ये सुमारे ५०० स्पर्धकांमध्ये घेतली जाते, प्रत्येक वर्षी स्पर्धकांची संख्या वाढत आहे.
स्त्रोत : संकलित माहितीवर आधारित | कार्यक्रम.....
सूर्यनमस्कार स्पर्धक
औंध पुण्यनगरीत प्रतिवर्षी चैत्र शु. || तृतीया ते चैत्र शु. || दशमी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सन १९८२ पासून अखंड चालू आहे. आज मितीस या सोहळ्यास २९ वर्षे पूर्ण झाली असून यंदाचे ३० वे वर्ष आहे.
श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम साप्ताह रोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ७ ते १० व दुपारी ३ ते ५ ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक वाचन, सायंकाळी ६ ते ७ प्रवचन, ७ ते ८ हरिपाठ व रात्रौ ९ ते ११ हरिकीर्तन, रात्रौ १२ ते ४ जागर ( भजन ) होते.
चैत्र शु.|| नवमीला सकाळी १० ते ११ रामजन्माचे कीर्तन होते. चैत्र शु. || दशमीला सकाळी ६ ते ७ ज्ञानेश्वरी सांगता, ८ ते ११ दिंडी सोहळा, दुपारी १ ते ३ काल्याचे कीर्तन. व ४ ते ५ महाप्रसाद असतो. औंध नगरीतील ग्रामस्थ हा उपक्रम राबवीत आहेत.
स्त्रोत : पारायण कार्यक्रम पत्रिका | कार्यक्रम.....
विठ्ठल-रुक्माई मंदिर, औंध
प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात पौर्णिमेला औंध येथील ज्योतिर्लिंग देवाची यात्रा कुंभार समजाकडून भरविली जाते. आदल्या दिवशी संध्याकाळी छबिन्याने यात्रेस प्रारंभ होतो, कुंभारवाड्यातील देवाचे दार मंदिरातून श्री जोतिबा व काळभैरव यांच्या मुखवट्यांची पालखीत प्रतिस्थापना करून सालकरी, डवरी यांच्या आरती नंतर छबिण्यास सुरुवात होते. छबिन्यासमोर गगनचुंबी मनाच्या सासनकाठ्या ढोलाच्या तालावर भाविक ठेक्यात नाचवतात. यमाई भेटीनंतर छबिना औंध पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर असलेल्या नाथाच्या डोंगरावरील जागृत जोतिबा देवाच्या यात्रेसाठी रवाना होतो.
दुसऱ्या दिवशी जोतिबाच्या मूर्तीस जलाभिषेक व रुद्राभिषेक होतो व नंतर दुपारी अडीच वाजता मुख्य छबिन्यास सुरुवात होते. 'चांगभलं' च्या गजरात व गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत आणि ढोलाच्या तालावरती सासनकाठ्या नाचवत व पारंपारिक लेझीम नृत्य करीत छबिना नाथाच्या डोंगरावरून खाली येऊन ग्रामप्रदक्षिणा घालून रात्री ११:३० - १२:०० च्या सुमारास पुन्हा देवाचे दार मंदिरात येतो या ठिकाणी समारोपाची आरती होते.
स्त्रोत : संदर्भ सूची | कार्यक्रम.....
जोतीबा मंदिर, औंध
चैत्र शु. प्रतिपदेला वासंतिक उत्सवाची सुरुवात होते पाच दिवस हा उत्सव चालतो. श्री यमाईदेवीची षोडषोपचारे पारंपारिक पद्धतीने पूजा केली जाते, भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात व पंचमीला सायंकाळी ४ वाजता देवीची रथातून मिरवणूक निघते हि मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा करून ग्रामतळ्यावर येतो व ब्राह्मणी घाटाला श्री यमाई देवीच्या उत्सव मूर्तीला षोडषोपचारे स्नान घालून पूजा करून देवी तळ्यावरील 'मोकळाई' देवीच्या भेटीत्सव काही काळ विश्रांती घेते व नंतर रथाची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण होते.
स्त्रोत : संदर्भ सूची | कार्यक्रम.....
औंधचा रथ
वर्षातून देवीचे ३ उत्सव असतात त्यापैकी शारदीय नवरात्र उत्सव हा एक आहे. संस्थानच्या पंत प्रतिनिधी घराण्याचे दैवत असणारी देवी हि अगोदर कराडस होती पुढे हि देवी औंध मध्ये आणण्यात आली याच कराडदेवीचा उत्सव आहे तो नव दिवसांमध्ये चालतो. पहिला दिवस : अश्विन शुध्द प्रतिपदेचा हा दिवस असतो. पंतप्रतिनिधींच्या हस्ते 'पुण्याह' वाचन देवक प्रतिष्ठापना, धार्मिक विधी करून 'श्रीं' ची मूर्ती सोन्या चांदीच्या मकारामध्ये स्थापना केली जाते. नव दिवस घटस्थापना करून महानैवध व महाआरती कीर्तन असा धार्मिक विधी सुरु होतो. आष्टमीच्या दिवशी मुळपीठवर पालखी सहा प्रदक्षिणा घालून कार्यक्रमाचा समारोप होतो.
नवमी : महाआरती होते,
दसरा : यादिवशी वाड्यामध्ये जेवण असते. व सायंकाळी गावाच्या जवळच असणाऱ्या काजळ वडाच्या वेशीवर देवीची पालखी पोहचल्यावर दळवी यांच्या हस्ते आपटा पुजून झाल्यावर सरदारांची तलवार आपट्याच्या झाडाला लावल्यावर आलेली लोकं सोनं लुटण्याचा आनंद घेतात.
श्रीमंतांच्या हस्ते गोळीबार होतो, संध्याकाळी मुळ पुरुषाच्या तलवारीने बलीरणा याचे पोट छाटले जाते. व कराड देवी समोर ऐतहासिक दरबार भरविला जातो.
स्त्रोत : संदर्भ सूची | कार्यक्रम.....
दसरा महोत्सव
पं. अनंत मनोहर जोशी उर्फ पं. अंतुबुवा जोशी हे औंध संस्थांचे राजगायक होते. त्यांनी औंध येथे राहून अनेक शिष्य तयार केले. पं. गजानन अनंत जोशी (बुवा) हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व प्रसिध्द व्हायोलिन वादक ह्या दोघांचे आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद ह्यांचा १९३९ ला मृतू झाले नंतर १९४० साली पं. अंतुबुवांनी औंध येथे आपल्या आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद यांच्या मृतू पच्यात त्यांच्या अस्ती ठेवलेल्या जागी दत्त मंदिर बांधले व आपल्या गुरूंच्या पुण्यतितीला आश्विन वधपंचमी ह्या दिवशी संगीत सेवा सुरु केली. औंध येथील संगीत सेवा पं. गजानन बुवांच्या तर्फे व्यक्तिगत सुरु होती. परंतु वाढता खर्च विचारात घेता तसेच हा उत्सव कायम स्वरूपी, अधिक व्यापक व सुसूत्रपणे होत रहावा म्हणून पं. गजानन बुवा जोशी ह्यांनी दि. २५ डिसेंबर १९८० रोजी " शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान " ह्या नावाने ट्रस्ट विश्वस्त संस्था म्हणून नोंदीत केला. गेली ६५ वर्षे अव्याहत पणे हि संगीतसेवा सुरु आहे. नामवंत गायक श्रद्धेने येथे सेवा म्हणून आपली कला हजारो रसिकांसमोर रुजू करतात. या उत्सवात येऊन गेलेले ठळक कलाकार पुढील प्रमाणे -
सर्वश्री पं. गजानन बुवा जोशी, पं. भीमसेन जोशी, पं. गंगुबाई हनगल, फिरोज दस्तूर, गिंडेबुवा, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. डी. व्ही. कानेबुवा. उस्तद तीरखावांखांसाहेब,पं. जसराज, माणिक वर्मा, पं. सी. आर. व्यास, पं. राम मराठे, जयश्री पाटणेकर, पद्मा तळवळकर, पं. सुरेश तळवळकर, पं. उल्हास कशाळकर, रोहिणी भाटे, क्षमा भाटे, सुचेता चाफेकर आदी.
स्त्रोत : संदर्भ सूची | कार्यक्रम.....
औंध संगीत महोत्सव
पुण्यातील सिंहगड रस्त्याच्या परिसरात १० ते १५ औंधकर राहतात हे समजल्याने श्याम कुलकर्णी यांनी औंध स्नेहसंमेलनाची कल्पना आपल्या सहकार्यान जवळ व्यक्त केली आणि हा विचार सर्वांनाच पसंत पडला. निदान पुण्यातील तरी औंधकरांनी एकत्र यावे असविचार झाला. १८ जुलै २००१ च्या दैनिक सकाळमध्ये तसे निवेदन केले या निवेधनामुळे १०० औंधकरांचे पत्ते मिळाले. पुढे हे संमेलन सर्वच औंधकरांसाठी उपलब्ध करावे लागले अन् २०० ऐवजी ३५० लोकांनी प्रत्यक्षात या संमेलनास हजेरी लावली. डॉं. अरविंद इनामदार यांनी गरवारे महाविध्यालायाचे सभागृह अगदी विनाशुक्ल उपलब्द करून दिले. इतकेच नव्हे तर ते प्राचार्य असे पर्यंत दरवर्षी ते उपलब्ध होईल असे जाहीर केले आणि ते आश्वासन त्यांनी पाळले. त्यामुळे २००६ च्या संमेलनापर्यंतची सर्व संमेलने गरवारे महाविध्यालयात पार पडली.
पहिल्या वर्षी सुविख्यात लेखक कै. ना. सं. इनामदार, दुसऱ्या वर्षी सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक श्री. मधुकर तथा बाबा पाठक, तिसऱ्या वर्षी शिक्षणतज्ञ श्री. एम. डी. कुलकर्णी, चौथ्या वर्षी संस्कृत पंडित श्री. प्रमोद लाळे, पाचव्या वर्षी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या प्रमुख सौ. सरोज भाटे आणि सहाव्या वर्षी गरवारे विज्ञान महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद इनामदार व ३ वर्षाच्या अंतराला नंतर २०१० ला डोंबिवली येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. भाऊसाहेब पंत हे औंधनगरीचे सन्माननीय नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
स्त्रोत : संदर्भ सूची | कार्यक्रम.....
औंध मेळावा २०१०
औंधच्या वायव्येस सुमारे २२ मैलांवर किन्हई हे गांव आहे. प्रतिनिधी घराण्याचे मूळपुरुष त्रिंबक कृष्ण कुलकर्णी यांच्या भक्तीसाठीं औंधची श्रीयामाईदेवी किन्हईस गेली अशी आख्याइका आहे. त्या देवीस साखरागड निवासिनी नांव प्राप्त झालें असून तें स्थान किन्हईच्या पूर्वेस अर्ध्या मैलावर डोंगरावरच आहे.
येथे कार्तिक शुध्द त्रयोदशीपासून वध्य तृतीयेपर्यंत उत्सव होतो. पौर्णिमेच्या दिवशीं औंधची देवी किन्हईच्या देवीस भेटण्याकरितां येते असते. ती तीन दिवस मुक्काम करून चौथे दिवशीं परत औंधास परत जाते. या उत्सवानिमित्त चांगली यात्रा भरते व बरीच उलाढाल होते. या यात्रेस जोडून गुरांचा बाजारही भरत असतो.
स्त्रोत : संदर्भ सूची | कार्यक्रम.....
साखरागड निवासिनी