जागे असा अथवा निद्रित
ह्रदयाची स्पंदने सदैव निनादत असतात
मनातील विचारांची पाखरे फडफडत असतात
आणि मेंदूतील संवेदना विचारांचा पाठलाग करतात
ह्र्दय, मेंदू, मन यांचा एकत्रित संगम जेव्हा घडतो
तेव्हा उमटतात त्या उस्फुर्त प्रतिक्रिया
खुले व्यासपीठ : औंध ... एक विचार !
औंध : एक स्वप्न : - अप्पासाहेब पंतप्रतिनिधी
१५ ऑगस्ट १९४७. भारत स्वतंत्र झाला ! स्वराज्यप्राप्तीचा आनंद मनाला सुखवीत होता पण औंध हे औंध म्हणून नाहीसे होणार याची जाणीव मनाला खंत देत होती. गेल्या काही वर्षात औंध संस्थान एक मोठे कुटुंबच झाले होते. एक परंपरा -जिच्या रूपाने परिवर्तन करून मुळे शाबूत ठेवावयाची आम्ही खटपट करीत होतो ती - अस्तंगत होती. हे सर्व व्हावयास पाहिजे असे वाटणाऱ्या माझ्या एका मनाला परंपरेचा पोलादी दोरखंड काचण्या लावीत होता. जीवनाची पाळेमुळे कोठे कोठे खोल रुजलेली असतात !
फेडरेशनची कल्पना स्वप्नवत होती - इतिहासाच्या जोराने वाहणाऱ्या प्रवाहात आयत्या वेळी वाळूचा बांध घालावयाचा तो प्रयत्न होता असे मला आता इतक्या वर्षानंतर कळते. तेव्हा मन बाबांच्याभोवती घुटमळत होते. औंधचा स्वराज्यदान प्रयोग अवतीभोवती पसरावा व त्यांना मोठेपणाचा मान मिळावा हीच दुर्दम्य इच्छा होती.
आता त्या घटनांकडे बघताना आणखी एक वाटते. माझे प्रयत्न मला तेव्हा वाटत होते तसे 'निष्काम' नव्हते. म्हणूनच कदाचित मी लोकांच्या मनात संशय निर्माण करीत असेन, स्वत:ला अडथळे निर्माण करीत असेन. भगवान बुध्द म्हणतात त्याप्रमाणे 'सम्यक् कर्म' करावयाची जर माझी पात्रता असती तर ? पण सर्वच दक्षिण संस्थानिक व हा सर्व प्रयोग हा सबंध भारताच्या इतिहासाच्या भव्य पटलावर एक भातुकलीचा खेळ होता.परिवर्तनाच्या प्रचंड जलौषात तो कुणीकडच्या कुणीकडे वाहून गेला.
बदल झाले. संस्थाने विलीन झाली. मला वाटे, बाबांनी खऱ्या अर्थाने केलेली देशसेवा कोठेतरी रुजू होईल. खरे म्हटले तर, ब्रिटीश सरकारला औंध म्हणजे एक डोकेदुखीच होती. परंतु राज्यसत्तात्याग करण्यापूर्वी त्यांनीही बाबांना किताब दिला.
पंडितजी १९४१ मध्ये औंधला येऊन राहून गेले होते व औंध-प्रयोगाबद्दल त्यांनी आमचे अभिनंदन केले होते. मला वाटले होते, ते तरी बाबांना बोलवतील, गौरव करतील, धन्यवाद देतील. त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगाचे व परिस्थितीने घडलेल्या नव्हे, तर जाणूनबुजून केलेल्या त्यागाचे - स्वतंत्र मिळण्यापूर्वी ब्रिटिशांना तोंड देऊन दहा वर्षे आधी केलेल्या त्यागाचे चीज होईल, त्यांच्या उतारवयात त्यांना त्याचा आनंद होईल, त्यांचे आयुष्य वाढेल.
प्रत्यक्षात हे काहीच झाले नाही. सातारहून कोणीतरी तिसऱ्या दर्जाचा अधिकारी आला आणि कशातरी घाईघाईने छापलेल्या कागदावर - विलीनीकरणाच्या दस्तऐवाजावर - बाबांची सही त्याने मागितली. एक ऐतिहासिक घटना घडत आहे, त्या प्रसंगाची काही बूज, काही शान राखली जावी याची दाखलही त्या बिचाऱ्याला नव्हती.
माझे पुतणे युवराज बापूसाहेब यांना अवघडून आले. बाबांपेक्षा ते जास्त दु:खी झाले. औंध स्वराज्यदान प्रयोग चालू असताना बापूसाहेब इंग्लंडमध्ये होते. १९४३ साली परत आल्यावर चाललेल्या प्रयोगात भाग घेण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला. जनशक्ती ओळखून तिला आपलीशी केली पाहिजे हे त्यांनाही पटले होते. होते तसेच चालू राहिले असते, तर युवराज हे मानाचे स्थान त्यांचे कायम राहिले असते. त्यांच्या शब्दाला औंध संस्थानात किंमत राहिली असती. विलिनीकरण झाल्यावर तेसुद्धा राहणार नव्हते. विलीनीकरणाच्या कागदावर सही होण्याच्या वेळीच जिन्यावरून धावत वर येत ते मला म्हणाले, "काका, हे थांबवता येणार नाही का ? तुम्ही पुन्हा जाऊन महात्माजींना भेटा ना. औन्ध्ची सत्ता जनतेच्या हाती आहे. औंध स्वतंत्र का राहू नये ? " मी त्यांना ही गोष्ट आता, या घटकेला अशक्यप्राय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा प्रवाह धो-धो पुढे जात होता. त्यात उलट दिशेने कोण पोहणार ?
बाबांनी कऱ्हाडदेवीसमोर विलीनीकरणावर सही केली. तीनदा मोठ्याने ते ' जय जगदंबे ' म्हणाले व गप्प झाले - अगदी गप्प. तीनशे वर्षांनी औंध संपले होते !
बाबा गेले, बापूसाहेबही गेले. आता राजा हे पदही गेले आणि औंध ? औंधही वाऱ्यावर विरले काय ?
- अप्पासाहेब पंतप्रतिनिधी
अप्पासाहेब पंतप्रतिनिधी
अप्पासाहेब पंतप्रतिनिधी
गुगल जाहिरात
पिंपळपान - राम नाईक
एखद्या कसलेल्या धावपटूला शोभेल अशा वेगात भल्या पहाटे औंधच्या डोंगरावरील श्री यमाई देवीच्या दर्शनासाठी धावत निघालेले औंधचे महाराज बघण्यासाठी मी बालपणी उत्सुक असे. धावणाऱ्या महाराजांचे दर्शन हा माझ्या हा माझ्या बालवयातला एक अनोखा आनंद असे. १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धातील माझ्या जन्मानंतरची पहिली ६-७ वर्षे मी औंधमध्ये होतो. त्या काळातील हि सर्वात लोभस आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. आजच्या तरुणाईच्या भाषेत कै. बाळासाहेब पंतप्रतिनिधी माझेच नव्हे तर तमाम औंधातल्या मुलांचे जणू आयडॉलच होते!
औंधच्या महाराजांच्या शाळेत माझे वडील कै. दामोदर विठ्ठल नाईक म्हणजेच नाईक मास्तर मुख्याध्यापक होते. पुढे वडिलांची बदली होऊन आम्ही औंध संस्थानातीलच आटपडिला रहायला गेलो, तरी औंधशी जुळलेलं नातं कायम राहिलं वारंवारच्या भेटीमुळे ते जोपासलं गेलं. आज मागे वळून पाहताना वाटत कि माझ्या जडणघडणित औंधचेहि एक खास स्थान आहे. इथे थोरामोठ्यांच्या अस्तित्वाचे कळत - नकळत जे संस्कार झाले ती शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडली.
आमचं घर होत प्रसिद्ध उद्योजक कै. शं. वा. किर्लोस्कर यांचे बंधू कै. रा. वा. किर्लोस्कर यांच्या शेजारी. स्वाध्याय आश्रमांचे वेदशास्त्र संपन्न पंडित सातवळेकर (सुप्रसिद्ध चित्रकार माधव सातवळेकर यांचे वडील) यांच्या स्वाध्यायमाला पुस्तकांच्या ज्ञानगंगेचे काही कणही औंधमध्येच वाट्याला आलेले. माझ्याही लहानपणीपासून औंधातले पंतप्रतीनिधींचे वस्तुसंग्रहालय म्हणजे तर बाहेरच्या जगाचा आरसाच. मोठेपणी 'हेन्री मूर' किती मोठा शिल्पकार आहे हे जाणवलं. पुढे देशाचा पेट्रोलियम मंत्री या नात्याने इंग्लंडलाही जायचा योग आला. तिथे तर तो अनेकांचे दैवत. त्याच हेन्री मूरचे मूळ 'मदर अण्ड चाईल्ड' शिल्प आपल्या औंधात बालवयात पहिले आहे हे इंग्लंड मध्ये सांगताना कोण अभिमान वाटला होता.
औंधचे महाराज सूर्यनमस्कारांचे भोक्ते. शाळेतही विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार घालून घ्यावेत असा त्यांनी नियम केला होता. कडक शिस्तीच्या माझ्या वडिलांनी त्यांच्या या नियमांचे शाळेत काटेकोर पालन केले. सतत अकरा वर्षे दररोज घातलेल्या त्या २५ सूर्यनमस्कारांनी जो कटकपणा - कणखरपणा आला त्यांच्या बळावरच आज वयाच्या पंच्याह्त्तरीतही दिवसाचे बारा - चौदा तास मी उत्साहाने समाजकारण करू शकतो. औंधकरांचे हे देणे फेडता न येण्यासारखेच.
औंधकरांच्या शाळेत गरिबालाही शिक्षण घेण्याची सोय होती. माझ्या लहानपणी मुलीना व शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण होते. तर इतर विद्यार्थ्यांसाठी अवघी दोन आणे फी होती. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान खालसा झाली. पण अशा प्रागतिक निर्णयांमुळे औंधसारखी संस्थान लोकांच्या मनावर नंतरही राज्य करीत राहिली. माझ्या वडिलांनीही शिक्षणाची अतिशय तळमळ होती. तिचे चीज औंधकरांनी केले. त्यांना विद्यार्थ्यांचे भरपूर प्रेम मिळाले. अनेकांनी त्यांचे सदैव स्मरण ठेवले. महाराष्ट्राचे वाल्मिकी कै. ग. दि. माडगुलकर, मराठवाडा (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर) विद्यापीठाचे कुलगुरू कै. शंकरराव खरात, व्यंकटेश माडगुलकर यासारखे महाराष्ट्रभूषण माझ्या वडिलांचे औंधकर विद्यार्थी. या सर्वांचा स्नेहही आयुष्यात श्रीमंत करणारा ठरला. त्यामुळे मला औंधच्या आठवणी या सदैव पुस्तकात जपलेल्या पिंपळपानासारख्या वाटतात.
- राम नाईक
राम नाईक
गुगल जाहिरात
रंग तळ्याचे - आप्पा पुराणिक
मनाला अत्यंत आनंदित करणारा शब्द म्हणजे 'रंग'
मनात आनंदाच्या लहरी निर्माण करण्याची केवढी ताकद रंग या शब्दात आहे.
औंधच्या तळ्याचे रंग असेच मजेशीर आहेत.
फार पूर्वी गावात अकरा तळी होती असे सांगितले जाते. काही गाळाने भरून आली. काहींची पडझड झाली. काहींवर दगडमाती टाकून लोकांनी घरं बांधली, तर काहींच्या विहरी झाल्या. आज तीन तळी सुस्थितीत असून दोन पाण्याने तुडुंब भरलेली आहेत.
सातारा जिल्ह्यातील सर्वांत मोठी तळी बहुतेक औंधची असावीत. दोन्ही प्रचंड तळी; पण पलीकडील मोठे व अलिकडील लहान, या तळ्याला पाच घाट असून वेगवेगळी नांवे आहेत. चारी कोपऱ्यांवर हेमाडपंथी छोटी महादेव मंदिरे आहेत. यमाईचे भक्त मोकळाईच्या घाटात हातपाय धुतात व देवीचे दर्शन घेऊन समईतील तेल लावतात. खरुज, नायटे, त्वचारोग बरे होतात हि श्रद्धा.
उन्हाळ्याच्या सुट्टीत लोकांची पोहण्यासाठी कोण गर्दी ! या गावात निष्णात पोहणारे असंख्य होते. डबे, दोर, मोदळ, टायरट्यूब, इत्यादी साधने होतीच. ओंडक्याप्रमाणे पाण्यावर निश्चल तरंगणारी मानसही कमी नव्हती. रामभाऊ चितारी, दादुमिया माहूत, बाबुराव मोदी, बापूबुवा हरदास, वरुडकर - इनामदार बंधू इत्यादी काही ठळक व्यक्ती.
या तळ्यात पोहणारा माणूस समुद्रही पार करेल इतका आत्मविश्वास येथे मिळेल. पुरोगामी विचारांची किर्लोस्कर - ओगले मंडळी तर या त्या काळात स्विमिंग कॉस्च्युम घालून पोहत असत अ हा गावात कुतूहलाचा व चर्चेचा विषय होत असे.
पैलवान घाट खास पुरुषांसाठी. वाकलेल्या गुलमोहराच्या झाडावरून ताठपणे वर चढत जाऊन पाण्यात मुटकळा टाकून उंच पाणी उडवणे ही स्पर्धाच जणू पाहायला मिळायची. त्या उंच तुषारातून साकारलेला इंद्रधनुष्याचे मनोवेधक रंग मनातील आनंदाचे कारंजे जणू निर्माण करी. वासू खटावकर, इनामदार, यादव, माने, रणदिवे, पोळ यांचा सहभाग असायचा.
खांबाला कवटाळणे, खांब पुढेमागे हलवणे, वर चढून सूर मारणे यामध्ये वेगळीच काही मजा वाटे. अश्यातच मुलं ओरडायला लागत, " आलं, आलं, विमान आलं !" बाप्पा किर्लोसाकारांच्या विमानानं मूळपीठला फेऱ्या मारून अगदी खालून तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून केव्हा उंच उड्डाण केले हे काळायचंही नाही.
हायस्कूल मुलामुलींची 'वॉटर बॉल' चे सामने पाहण्यासाठी खुद्द राजेसाहेबांची स्वारी खुर्चीवर विराजमान होत व प्रोत्साहन देत.
शाहीर नानिवडेकर हे पोहण्यासाठी औंधकरांना अगदी परिचित. तर ते उत्तम क्रीडापटू व जलतरणपटू होते हे कित्येकांना माहित नाही. मोकळाई घटनजिक उंच शिड्या बांधून त्यावरून समर सॉल्ट, उलटी उडी इत्यादी थक्क करणारी ऑलम्पिक दर्जाची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली. राजेसाहेबांनी तोंडभरून वाहवा केली. त्यांची पाठीवर थाप ही लाखमोलापेक्षाही अधिक वाटायची.
आमची प्राथमिक शाळा तळ्यानजिक हिरापुरीबुवांच्या मठात असे. खोल्या लांबट, बसण्यास गोणपाटाची बस्करे, विस्तारलेल्या उंच वडाच्या, झाडाच्या, झाडावरील मोर केकारव करीत. समोरच्या काळापलिकडील शेतात नाचणारे असंख्य मोर पाहून बालमन अगदी हुरळून जायचं. विविध आकारांची पिसे गोळा करून गुच्छ केल्याचा आनंदही त्याकाळी भरून वाहायचा.
तळ्याच्या काठावर बसून पाण्यातील रंगतरंग पाहण्याची वेगळी गंमत वाटायची. दगड टाकून लांब पसरत जाणाऱ्या लाटा, लाह्या,चिरमुरे पाण्यात फेकून त्याभोवती खाण्यासाठी सळसळत येणारे मासे, हे पाहण्यात किती वेळ गेला हे त्यावेळच्या धुंद मनाला समजायचे नाही. मुलाचा शोध घेणाऱ्या आईचा जोराच धपाटा बसल्यावर मन शुद्धीवर यायचं. मार खात, फरफटत घरी जावे लागे.
राजवाड्यातील प्रत्येक सन उत्सव जणू गावाचाच. अशा कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असे. गणेशोत्सव, शिवजयंती, रामनवमी इत्यादी लक्षात राहणारे उत्सव !
त्याकाळी घरातील बायकांना डोंगराएवढी कामे. त्यातून कडक सासुरवास. सून म्हणजे बंधनात जखडलेली, मन मेलेली पारतंत्र्यातील बाई ! औंधातील सुनांना विसाव्याचे ठिकाण म्हणजे तळं. कपड्यांचा ढिगारा घेऊन तळ्याच्या घाटावर कपडे धुणं म्हणजे महिलेला जाचातून काही वेळ मुक्तता.
या निमित्ताने मोकळेपणा मिळायचा. सासूबद्दल चेष्टामस्करी, टवाळकी, चहाड्या तक्रारी, विनोद गोष्टी केल्यामुळे मनं हलकी व्हायची आणि कपड्यांचा ढिगारा धुऊन हातावेगळा केव्हा झाला हे कळायच देखील नाही. घरी येताच खूप वेळ झाला म्हणून पुन्हा सासूची बोलणी खावी लागत.
गावातील चंद्रा नायकीण म्हणजे एक बडं प्रस्थ ! सुस्वरूप, गोरा रंग, सुडौल बांधा आणि देवानं दिलेली आवाजाची देणगी. लावणी ऐकण्यासाठी लांबलांबचे रसिक येत. कुणीतरी शक्कल काढली. " आपण महाराजांना भेटू व चंद्राचं नाचगाणं तळ्यात करू. महाराज खूष व गावही खूष होईल."
ठरलं. राजेसाहेबांचा होकार मिळाला. पुढील कामे वेगाने होऊ लागली. पण तरंगता रंगमंच ? कुणीतरी बोललं, "मी करतो मंच. " उसाच्या रसाळी मोठी काहील आणली गेली. त्यावर फळ्या टाकल्या. डांब उभारले. कागदाची तोरणं बांधली. रंगीत कापड गुंडाळले. उसाचे सोट, केळीचे खुंट बांधले. गॅसबत्या अडकवल्या.
चैत्री पौर्णिमेची रात्र. सुशोभित रंगमंचाचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब. काठावर मध्यभागी राजेसाहेब. भोवताली रसिकजणांची प्रचंड गर्दी ! ढोलकीवर थाप पडली. वाद्य सुरात लागली आणि कलाकारांनी लवून मुजरा केला. सुरात स्वर मिसळले. एक लांब लकेर मारून चंद्रा चार पावलं पुढं आली. टाळ्यांचा कटकडाट. नाचगानं रंगात आलं. दोन अडीच तास केव्हा सरले ते कळलं नाही. धुंद मैफिल, धुंद रसिक, धुंद वातावरण.
पण एकदम अघटीत घडलं. काहिलीत पाणी शिरलं. काहील जड झाली आणि चक्क डोळ्यासमोर पाहता पाहता बुडाली ! सर्वत्र हलकल्लोळ, हाहा:कार, राजेसाहेबांनी उभे राहून लोकांना सोन्याचं कडं दाखवून कलाकारांना वाचवण्याचे आवाहन केले.
पटाईत पोहणारे धडाधड पाण्यांत घुसले. बुड्या मारल्या. पण व्यर्थ ! वाचले ते फक्त केळाचे खुंट व उसाचे मोट.
पाण्याच्या पृष्ठभागावर लाटांचा तालावर एका कोपऱ्यात ढोलकी हुंदके देत होती. सर्वत्र निराशा, दु:ख आणि शोक !
पण हे असं कसं घडलं ? काहिलीच्या बुडास एक अगदी छोटसे छिद्र होते. कुणी शहाण्यांन त्या भोकाला कणिक तिंबून लावली. पाण्यातील माशांनी ती खाल्यावर पाणी हळूहळू काहिलीत शिरले आणि रंगाचा बेरंग झाला.
- आप्पा पुराणिक
आप्पा पुराणिक
रंग औंधच्या तळ्याचे
रंग औंधच्या तळ्याचे
रंग औंधच्या तळ्याचे
रंग औंधच्या तळ्याचे
पंतांचा ऐरावत - औंधकरांची गजलक्ष्मी - श्री. उदय वसंत चितारी, सौ. सुनीति उदय चितारी
आटपाट नगर होतं. त्याचं नाव होतं औंध. ह्या औंध नगरीतील 'रामप्रसाद' हत्तीची ही कहाणी.
तो दुर्दैवी दिवस मला आजही आठवतो. सकाळीच सातारा जिल्ह्यातून लग्नाच्या वरातीची ऑर्डर आल्याने पागेतून याह्या माहुताने हत्तीला बाहेर काढले. अंघोळ घालून रंगवले, सजवले. झूल घालून रामप्रसादची स्वारी तयार झाली. माहुताने चालण्याची आज्ञा दिली. पण आज काहीतरी बिनसले होते. रामप्रसादची मर्जी नव्हती. खालच्या देवीच्या देवळात येऊन सोंड उंचावून देवीला त्याने त्रिवार नमस्कार केला. पण पुढे पाऊल पडेना. पुनः पुन्हा होणाऱ्या अंकुशाच्या माराने तो बेचैन झाला. पुढे श्रीनिवासराव महाराजांच्या समाधिला नमस्कार झाला. वरच्या देवीच्या टेकडीशी येऊन मूळपीठाकडे तोंड करून जोरदार सलामी दिली. याह्या माहूत पुनः पुन्हा त्याला गावाबाहेर जाण्यासाठी टोचू लागला आणि तितक्याच वेळा तो आपली नाराजी दाखवत राहिला. शेवटी मोठ्या कष्टाने रामप्रसादने गावची वेस ओलांडली. दहापंधरा पावले जेमतेम टाकली तोच त्याचा पाय घसरला व रस्त्याच्या उजवीकडे एका छोट्याशा खड्यात कलंडला. पण पडतानाही त्याने माहुताला विरुद्ध बाजूला अलगद उतरून दिले व धरणीवर देह झोकून दिला. सगळा मिनिट भराचा मामला आणि आमच्या गजराजाने रामप्रसादने प्राण सोडला. सगळा परिसर नि:स्तब्ध झाला. गावात बातमी आली आणि शोकसागर उसळला. घराघरातून माणसे वेशीवर धावत आली. आबालवृध्द शोकाकुल झाले. आम्ही लहान मुले तर रडूच लागलो. गाड्यावरून हत्तीला पागेत आणले गेले. सर्व औंधकरांनी साश्रूपूर्ण नयनांनी त्याला निरोप दिला. कसा विसरू मी तो दिवस ?
औंधच्या महाराजांच्या रामराज्यात भाग घेण्यासाठी जणू देवीनेच 'रामप्रसाद' पाठवला होता. त्याचा दिवस सुरु होई भूपाळ्या ऐकत. नंतर तळ्याकाठी आंघोळ करून तो डोंगरावर चरण्यासाठी जाई. संध्याकाळी रमत - गमत गावातून चक्कर टाकत असे. तो इतका शांत व समंजस होता, कि वाटेत रांगते मूलही आले तरी तो स्तब्ध उभा राहत असे. त्याने कधीही कोणालाही जाणूनबुजून इजा केली नाही. कोणी व्यापारी त्याला नारळ देई तर कोणी त्याला केळी देई. पण त्याचे आवडते खाद्य म्हणजे ऊस. ऊस त्याला फार आवडे. संध्याकाळच्या देवीच्या आरतीने त्याचा दिवस मावळे. तो दिसायला सुंदर व भारदस्त होता. पण खरा दिमाख दिसे तो नवरात्र उत्सवात. नवरात्रोत्सवात त्याचे स्थान मानाचे होते. माहूत त्याला रंगावी, भरजरी झूल घाली. गळ्यात सोनेरी घंटा अडकवी. पायात चांदीचे जाड वाळे घालून रामप्रसाद चालू लागल्यावर वाटे कि, जणू साजशृंगार करून लग्नासाठी नवरदेवच चालला आहे. दसऱ्याला सोन्याच्या अंबारीत राजेसाहेब बसले म्हणजे त्याच्या चालण्यात एक धीरगंभीर भाव जानवे. पौषातील जत्रेमध्ये चाबिन्यापुढे व रथापुढे चालताना एका वेगळ्याच ऐटीत पावले पडत असत. रथासामोरची त्याची उपस्थिती हे एक आकर्षण होते. त्यावेळी आमच्या गावात बैलगाड्यांच्या शर्यती होत. त्यांना चिअर-अप करण्यासाठी 'रामप्रसाद' डुलूडुलू धावत असे. त्यावेळी फार गंमत येई. आमच्या चितारी घराण्याचे पंत घराण्याशी फार घरोब्याचे संबंध होते. माझ्या आई - दादांच्या लग्नाची वरात याच हत्तीवरून निघाली होती. किती आठवणी सांगू ?
'वनकेसरी' सिनेमाच्या शूटींगच्यावेळी घडलेला एक रोमहर्षक प्रसंग मला आठवतोय. बऱ्याच फिल्मच्या शूटींगसाठी आमचा हत्ती जात असे. यावेळी औंधच्या मैदानात शूटिंग चालू होते. मोठ्या अणकुचीदार खिळ्यांच्या दरवाजाला धडक देऊन हत्ती आत शिरतो. त्या दृष्ट माणसाला सोंडेत पकडून गरागरा फिरवून फेकून देतो. धावत जाऊन त्याच्या छातीवर पाय देतो व त्याला ठार मारतो. या शॉटला काही केल्या स्टंटमन तयार होईना. तो खूप घाबरला होता. माहुताने चार-पाच वेळा स्वतः त्याला शॉट करून दाखवला. तेव्हा कुठे महत् प्रयासाने स्टंटमन तयार झाला. माहुताने हत्तीला तयार केले. दरवाजा पडला. हत्तीने आत येऊन त्या माणसाला उचलले व उंच फिरवून अलगद गवतावर फेकले. नंतर धावत येऊन हळूच अचूक त्याच्या छातीवर पाय ठेवला आणि शॉट ओके झाला. अत्यंत समंजसपणे आमच्या या अभिनेत्याने हा शॉट दिला व सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 'गजगौरी' हा सिनेमा म्हणजे त्याच्या अभिनयाचा कळसच होता. अगदी 'फिल्मफेअर' अॅवॉर्ड देण्याजोगा !
अश्या या 'रामप्रसादच्या' मृतूनंतर काही वर्षे आम्ही त्याच्या आठवणींवरच काढली. श्री यमाईची पालखी, रथ काहीशा उदास आठवणीतच होत होते.
श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या लग्नात नागपूरच्या धनवाटेंनी कन्येला आहेर म्हणून 'मोती' हत्ती देणगी दिला आणि पुन्हा एकदा औंधात जान आली. हा 'मोती' आला तेव्हा छोटा व गोंडस बालहत्ती होता. राजस्थानातून याला आणले तेव्हा पुन्हा एकदा औंध गाव नव्हे पुरा सातारा जिल्हा स्वागताला वेशीवर जमा झाला. फुलांचे हार घालून ओवळून वाजत गाजत 'मोती' ची स्वारी गावात आली. खालच्या देवीच्या दर्शनाला त्याला थेट गाभाऱ्यात घंटेपर्यंत नेले. त्याने देवीचे दर्शन घेतले व देवीनेही त्याचे दर्शन घेतले. दोघेही धान्य झाले. पुन्हा एकदा औंधची शान झळकू लागली व उदास पालखी हंसली. आम्हा औंधकरांच्या ह्रदयावर राज्य करणारी गजलक्ष्मी स्वारी देवीसमोर झुलू लागली. 'टिपू सुलतान', 'रामप्रसाद' व 'मोती' अशा तीन हत्तींच्या पिढ्यांनी देवीची सेवा केली व 'मोती' आजही देवीची सेवा करतो आहे.
जो कोणी या गजलक्ष्मीवर जीवापाड प्रेम करेल त्याला यमाई काही कमी पडू देणार नाही. धनधान्य - समृद्धि मिळेल. हा वसा काही टाकू नये. हि साठा उत्तरांची कहाणी, पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण !
- श्री. उदय वसंत चितारी, सौ. सुनीति उदय चितारी
श्री. उदय व चितारी, सौ. सुनीति उ चितारी
औंधचा हत्ती 'मोती'
औंधचा हत्ती 'मोती'
औंधचा हत्ती 'मोती'
औंधचा हत्ती 'मोती'